मला जन्मभरासाठी अपात्र करा, लोकशाहीसाठी लढतच राहीन; राहुल गांधी यांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:28 AM2023-03-26T06:28:03+5:302023-03-26T06:28:09+5:30
अदानींवरून लक्ष विचलित करण्यासाठी कारवाई
नवी दिल्ली : मला संसदेतून आजीवन अपात्र ठरविले किंवा तुरुंगवास झाला तरीही देशातील लोकशाहीचे रक्षण करत राहू, अशा शब्दात आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. घाबरलेल्या सरकारने त्यांना अपात्र ठरवून विरोधकांकडे मोठे शस्त्र दिल्याचा दावा त्यांनी केला.
लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील त्यांच्या पुढच्या भाषणाला घाबरले म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हा संपूर्ण खेळ या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा होता. कारण, सरकारला या प्रकरणावरून भीती वाटत होती.
अदानी प्रकरणावर प्रश्न विचारत राहणार असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, अदानी शेल फर्ममध्ये २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आणि त्या व्यावसायिकाचे पंतप्रधानांशी काय संबंध आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या देशात लोकशाही संपली आहे, असे सांगून ते म्हणाले की, ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यात कधीही परकीय हस्तक्षेपाची मागणी आपण केली नाही. आपल्याविरुद्ध संसदेत खोटे बोलले गेल्याचा आरोप त्यांनी केंद्रीय मंत्र्यावर केला. यावर आपल्याला उत्तर द्यायचे आहे, परंतु परवानगी नाही, असेही ते म्हणाले.
माफी? माझे नाव गांधी, सावरकर नाही...
माझे नाव सावरकर नाही. माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाला माफी मागत नाहीत, असे राहुल एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप करून भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असून, उद्योगपती अदानी यांच्याशी पंतप्रधान मोदींचे काय नाते आहे, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, मी इथे भारतीय लोकांच्या आवाजाचे रक्षण करत आहे.
मी धमक्यांना, अपात्रतेला, आरोपांना, तुरुंगवासाच्या शिक्षांना घाबरत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. ते म्हणाले की, त्यांना सर्वांचे लक्ष विचलित करायचे आहे. तुम्ही चोर पकडलात, तर पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतील, मी ते केले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ते म्हणतील तिकडे बघा, तिकडे बघा... भाजप हेच करत आहे.
हे सर्व नाटक - ओबीसी, अपात्रता, देशद्रोही या भीतीपासून लक्ष विचलित करण्यासाठी रचले जात आहे. अदानीसोबतचे आपले संबंध उघड होत असल्याची पंतप्रधानांना भावना आहे. ते नाते उघड होणार आहे. ते कोणी थांबविणार नाही. हे होणार आहे कारण विरोधक ते उत्तर शोधणार आहेत, असेही ते म्हणाले.