असंतुष्टांचा सोनिया गांधींवर विश्वास, राहुल, प्रियांकावर मात्र अविश्वास; वादाला कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:27 AM2022-03-19T06:27:27+5:302022-03-19T06:52:57+5:30
महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत.
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील कलहाला आज महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली. काँग्रेसमधील असंतुष्टाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्यास असंतुष्ट नेत्याचा विरोध नसून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध असल्याचे आज स्पष्ट झाले. याच मुद्यावर असंतुष्ट गटाची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर मांडली.
महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोडल्यानंतर अद्यापही काँग्रेसला पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचा दावा काँग्रेसमधील असंतुष्ट नेते करीत आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर राहुल व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाच्या क्षमता पुन्हा अधोरेखित झाल्या. या मुद्यावरून गुलाम नबी आझाद यांनी आझाद यांनी या भेटीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कुणाचाही अविश्वास स्पष्ट नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.
असंतुष्टांचा विरोध
असंतुष्टांचा विरोध राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला तसेच त्यांच्या भोवती असलेल्या नेत्यांना आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची निवड तसेच उत्तरप्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीमध्ये चर्चा न करताच घेतल्याचे यावेळी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे दोन्ही निर्णय काँग्रेसला महागात पडल्याचे स्पष्ट झाले.
संघटनात्मक निवडणुकांवरही चर्चा
काँग्रेस पक्षाने ब्लॉक स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका घ्यावा, असा मुद्याही या चर्चेत आल्याचे सांगण्यात आले.