'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:43 PM2020-06-26T16:43:31+5:302020-06-26T16:47:32+5:30
चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला
नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे, असे म्हणत काँग्रेसने आज देशभरात 'शहिदों को सलाम दिवस पाळला' आहे. यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले.
चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचे काँग्रेसने यापूर्वी म्हटले होते. लडाख सीमारेषेवरील तणावाचा आणि केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी आज २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी #SpeakupForOurMartyrs ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर राहुल गांधींनी मोदींना प्रश्न केला आहे.
प्रधानमंत्री जी,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 26, 2020
देश आपसे सच सुनना चाहता है।#SpeakUpForOurJawanspic.twitter.com/tY9dvsqp4N
भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भारतीय सैन्य आणि सरकारसोबत आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की देशाची १ इंच जमिनही कुणी घेतली नाही, कुणीही भारताच्या हद्दीत प्रवेश केला नाही. सॅटलाईट फोटोग्राफच्या माध्यमातून दिसून आलंय, लोकंही तसंच म्हणतायंत, लडाखची जनता सांगत आहे, आर्मीचे निवृत्त अधिकारीही सांगत आहेत की, चीनने आपली जमिन बळकावली आहे, केवळ एक जागेवर नाही तर तीन जागेवर चीनने जमिन बळकावली आहे. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी सत्य सांगायलाच हवं, देशाला खरं कळायलाच हवं. मोदींनी घाबरायचं काहीही कारण नाही, जर तुम्हीच म्हणाल की जमिन गेली नाही, मात्र, खरंच जमिन गेली असेल तर चीनचा फायदा होईल. आपण एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे. त्यामुळे, न घाबरता तुम्ही सांगा की चीनने आपली जमिन बळकावली आहे, असे राहुल गांधींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.