राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 09:51 PM2018-10-06T21:51:37+5:302018-10-06T21:54:08+5:30
मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले.
नवी दिल्ली: बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष या उत्तर प्रदेशातील पक्षांनंतर आता दिल्लीतल्या आम आदमी पक्षानं काँग्रेसला धक्का दिला आहे. नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिल्लीतील एका भाषणात म्हटलं. याआधी बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आम आदमी पक्षाचेच खासदार निवडून द्या, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. 'चार वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी जनतेनं दिल्लीतून भाजपाच्या 7 उमेदवारांना विजयी केलं. मात्र त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं 67 जागा देऊन आमचं सरकार स्थापन केलं. आता जास्त काम कोणी केलं? भाजपानं की आपनं? याचं उत्तर जनतेनं द्यावं,' असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आपचे 7 खासदार निवडून आले असते, तर कामांचा वेग दहापटींनी वाढला असता. आम्ही संसदेचं कामकाज ठप्प केलं असतं. मात्र मेट्रोच्या तिकीटाचा दर वाढू दिला नसता, असं केजरीवाल यांनी म्हटलं.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही चूक केली, असं अनेक दिल्लीकर सांगतात. आता आम आदमी पक्षालाच मतदान करु, अशी भावना अनेकजण बोलून दाखवतात. अनेकांना राहुल गांधींना मतदान करायचं नाही. पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आपचे खासदार निवडून यायला हवेत. दिल्लीत आप हाच पर्याय आहे,' असं त्यांनी म्हटलं. ज्यांना मोदींना हरवायचं आहे, त्यांनी काँग्रेसला मतदान करु नये. भाजपाचा पराभव करायचा असल्यास आपला मत द्या, असं आवाहन केजरीवालांनी केलं.