जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:24 IST2024-12-26T11:56:43+5:302024-12-26T13:24:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Dr Ambedkar contribution to the development of water resources says PM Narendra Mod | जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

खजुराहो : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील जलस्रोतांच्या विकासाबाबत दिलेल्या योगदानाकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशमधील केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

खजुराहो येथील कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात काढलेले उद्‌गार व त्याबाबत विरोधी पक्षांनी केलेली टीका या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आंबेडकर व काँग्रेसबाबत वक्तव्य केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांडवाच्या ओकारेश्वर फिरत्या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन केले.

जलसुरक्षा हे २१ व्या शतकातील मोठे आव्हान

मोदी म्हणाले की, उत्तम व्यवस्थापन असलेले व पुरेसे जलस्रोत असलेले देशच २१व्या शतकात मोठी प्रगती करू शकतात. डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे देशातील धरणांची बांधकामे व जलस्रोतांचे संवर्धन अधिक उत्तम प्रमाणात होऊ शकले आहे. देशात जलसंवर्धनाची वाढती गरज लक्षात ठेवून काँग्रेसने त्या दिशेने कधीही पावले टाकली नाहीत. जलसंवर्धनाच्या क्षेत्रासाठी डॉ. आंबेडकरांनी जी कामगिरी बजावली, त्याकडे काँग्रेसने कानाडोळा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जलसुरक्षा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान आहे.

काँग्रेस, सुशासन हे एकत्र नांदत नाहीत- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस व सुशासन या दोन्ही गोष्टी कधीही एकत्र नांदू शकत नाहीत. केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाकडे काँग्रेसने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्या पक्षामुळेच या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला इतका वेळ लागला आहे. केन-बेतवा प्रकल्प बुंदेलखंडात समृद्धी व आनंद घेऊन येईल.

मध्य प्रदेशमधील दहा जिल्ह्यांतील ४४ लाख लोक व उत्तर प्रदेशमधील २१ लाख लोकांना केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठीही उपयोगी असलेल्या या प्रकल्पासाठी ४४६०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

काँग्रेसकडून अनेक वेळा अवमान : जी. किशन रेड्डी

काँग्रेसने अनेक वेळा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केंद्रीय कोळसामंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला.

डॉ. बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर केलेले आरोप रेड्डींनी फेटाळून लावले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना रेही बोलत होते.
 

Web Title: Dr Ambedkar contribution to the development of water resources says PM Narendra Mod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.