कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:46 PM2019-07-24T16:46:09+5:302019-07-24T16:50:23+5:30
एचडी देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.
मुंबई - कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अखेर शेवट झाला. सत्तेच्या चाव्या आता पुन्हा एकदा भाजपनेते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे आल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर आणि राहुल गांधीकाँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच काँग्रेसला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. काँग्रेसने जनता दल सेक्युलरसोबत सरकारही स्थापन केले. मात्र हे सरकार अखेर कोसळले. याला काँग्रेसची कर्नाटकमध्ये चांगले यश मिळविल्यानंतर केलेली चूकच कारणीभूत ठरली.
देवेगौडा यांना जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा नव्हती. ते आजही त्यांच्या मतांवर ठाम आहेत. खुद्द काँग्रेसने त्यांच्याकडे जाऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नव्हता, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी. कुमारस्वामी यांचे वडील एचडी देवेगौडा यांनी म्हटले होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर देवेगौडा यांच्याकडे गेले होते. त्यावेळी खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.
दरम्यान बंडखोरांमध्ये सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. परंतु, खरगे किंवा सिद्धरमया यांच्यापैकी कुणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते, तर बऱ्याच प्रमाणात काँग्रेसमधील बंडखोरीला वेसन घालता आली असती. परंतु, काँग्रेसने मुख्यमंत्रीपद स्वत:हून नाकारल्याने कर्नाटकच्या सत्ताकारणातील समिकरणे चुकत गेली. त्याचा अखेर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतरच झाला.