या कारणांमुळे दिल्लीतील काँग्रेस-आप आघाडीच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:20 PM2019-04-01T16:20:08+5:302019-04-01T16:21:04+5:30
राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र राहुल गांधी यंनी आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला. आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली काँग्रेस आणि आपची आघाडी होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1) दिल्लीतील सात जागांवर आघाडी करण्यासाठी काँग्रेसने आपसोबत चर्चा केली असती तर आपने गोवा, पंजाब आणि हरयाणामध्येही आघाडीचा विषय पुढे आणला असता, काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरले असते. त्यामुळे काँग्रेसला केवळ दिल्लीमध्येच आपसोबत आघाडी करायची आहे.
2) दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आप आग्रही आहे. त्यांनी दिल्लीतील जनतेला तसे आश्वासनही दिले आहे. मात्र काँग्रेसच्या मते हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे घाईगडबडीत यासंदर्भात आश्वासन देता येणार नाही, असे काँग्रेसचे मत आहे. तर आप या मुद्यावर माघार घेण्यास तयार नाही.
3) एकीकडे काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चा सुरू असताना अरविंद केजरीवाल हे प्रसारमाध्यमांमध्ये आघाडीबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. तसेच आघाडीसाठी होत असलेल्या उशिराचे खापर काँग्रेसच्या माथ्यावर फोडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
4) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. पण आम आदमी पक्षाच्या एकंदरीत धोरणामधून त्यांच्या हेतूबाबत शंका येत होती. आप हा काँग्रेसचा मित्र आहे की शत्रू हेच काँग्रेलला ठरवता येत नव्हते. त्यामुळे आपवर विश्वास ठेवणे काँग्रेसला काहीसे कठीण होत आहे.
5) एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतील सातही जागांवर बलाढ्य उमेदवार उतरवण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तसेच दिल्लीतील आपल्या आक्रमक अभियानासाठी दिल्लीती 70 आमदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे दिल्लीत तिरंगी लढल होण्याची शक्यता आहे.