एक अकेला... सर्वपक्षीय विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपकडून सिंहाचा व्हिडिओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:22 PM2023-06-23T19:22:22+5:302023-06-23T19:23:37+5:30
आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे.
पाटणा - देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज पाटना येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारला आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट केली असून आपापसातील मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याचा विचार मांडला. देशातील ११ विरोधी पक्षांनी या बैठकीला हजेरी लावत आपलं समर्थन दिलं. या बैठकीनंतर आता भाजपाकडून पलटवार करण्यात येत आहे. भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर भाष्य करताना, ही मोदी हटाओ बैठक नसून परिवार बचाओ बैठक असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. तर, भाजपने एक व्हिडिओ शेअर करत या बैठकीवर टीका केली आहे.
आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत. आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच, या बैठकीमुळे देशात बदल घडवण्याची सुरुवात पाटणातून झाल्याचंही ते म्हणाले. या बैठकीवर भाजपने टीका केली आहे.
भाजपच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये मोदींचा आवाज असून एक अकेला कितनों को भारी... असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असल्याचं ऐकू येतंय. याशिवाय व्हिडिओत एका सिंहावर अनेक कोल्हे हल्ला करत असून तो सिंह सर्वांना परतवून लावत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. भेड के हाहाकार के बदले शेर कि एक दहाड है!, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलंय.
भेड के हाहाकार के बदले शेर कि एक दहाड है!#OppositionMeetingpic.twitter.com/9oQtxa85Nh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 23, 2023
काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांनी बैठकीनंतर बोलताना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली. जयप्रकाश यांनी एक संदेश दिला आणि देशात संपूर्ण वातावरण बदललं होतं, असे पवार यांनी म्हटलं. बिहारमधून अनेक आंदोलनांची सुरुवात झाली आणि ते जनतेनं स्विकारले. आज नितीश कुमार यांनी येथे बैठका बोलावली, त्यासाठी सर्वपक्षीय सहकारी एकत्र आले. या बैठकीत चर्चा झाली, त्यातून सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याचं निश्चित केलं आहे. एक नवीन रस्ता दाखवण्याचं काम इथून सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की देशातील जनता याचं समर्थन करेल, असे शरद पवार यांनी म्हटले.
विरोधकांच्या बैठकीवर फडणवीसांची टीका
देशात सध्या मोदी विरूद्ध विरोधक असा संघर्ष हळूहळू अधिक तीव्र होत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेत आहेत तर दुसरीकडे आज बिहारच्या पाटण्यामध्ये सुमारे १५ विरोधी पक्षांनी एकत्रित मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनीही सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारला हटवण्यासाठी आम्ही सारे लोक एकत्र आलो आहोत, असा सूर विरोधकांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना आळवला. पण अशा मेळाव्यांचा काहीही फायदा होणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे वरच्या फळीतील नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या सुरू असलेला हा मेळावा म्हणजे मोदी हटाव मेळावा नसून परिवार बचाव मेळावा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती एकाच मंचावर आल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.