मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 09:39 AM2019-04-30T09:39:41+5:302019-04-30T09:40:56+5:30
निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातल्या आचारसंहिता भंगांच्या आरोपांवर आज निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करुन घेत न्यायालयानं मंगळवारी सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली. द्वेषपूर्ण भाषणं केल्याचा आणि लष्कराचा राजकीय वापर केल्याचा आरोप देव यांनी याचिकेतून केला.
सुष्मिता देव यांच्या वतीनं वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सुनावणी घेतली. मोदी आणि शहा यांच्या विरोधातल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात निवडणूक आयोगानं स्वीकारलेलं कारवाई न करण्याचं धोरण भेदभावाचं प्रतीक असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला धोका निर्माण होईल, अशी भीती देव यांनी व्यक्त केली. गेल्या 4 आठवड्यांत 40 तक्रारी करुनही भाजपा नेत्यांविरोधात कारवाई होत नसल्याबद्दल काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली.