'सत्ताधारी पक्षाला पाच राज्यांतील निवडणुका जड'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:57 AM2018-12-11T03:57:48+5:302018-12-11T06:45:57+5:30
राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले.
पुणे : आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला संघर्ष करावा लागेल. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. भाजपाला सत्तास्थापनेची पुन्हा संधी असून, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. पाच राज्यांतील निवडणुका सत्ताधारी पक्षाला जड जातील. राजस्थानात बदल होईल. छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे अटीतटीची लढत होईल. तेलंगणामध्ये काँग्रेस लढत देईल, पण तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर येईल, असे भाकीत राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केले.
‘गुरुकुल विश्वपीठ’ आयोजित अखिल भारतीय ज्योतिषी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री, ज्योतिष अभ्यासक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते झाले. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अजयचंद्र भागवत (गुरुजी), राजकीय ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर, विजय जकातदार, चंद्रकांत शेवाळे, डॉ. मधुसूदन घाणेकर, पल्लवी भागवत उपस्थित होते. मारटकर म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेतल्या, तर युतीला लाभ मिळेल, त्या घेण्यास उशीर झाल्यास त्यांना विजय मिळविणे कठीण जाईल.
मोडक म्हणाल्या, ‘ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे. ज्योतिष हे माणसाला हताश करण्यासाठी नाही, तर प्रेरणा देण्यासाठी आहे. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकट कळाले तरी त्यातून सावरण्याची ताकद अध्यात्मातून मिळते.’ ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे, डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे या मान्यवरांनी विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन केले.