पी. चिदम्बरम यांना सशर्त जामीन; शेवटी सत्याचाच विजय झाला -काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:48 AM2019-12-05T01:48:30+5:302019-12-05T01:53:25+5:30
माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, चिदंबरम यांचा १०० पेक्षा जास्त दिवसांचा तुरुंगवास हा सूडबुद्धीचा आणि द्वेषपूर्ण होता. चिदंबरम यांना पारदर्शी सुनावणीत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करता येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडियाशी संबंधित हवाला व्यवहार खटल्यात बुधवारी जामीन मंजूर केल्यावर काँग्रेसने ‘शेवटी सत्याचा विजय झाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर काँग्रेस भ्रष्टाचार साजरा करीत असल्याचे भाजपने म्हटले.
माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, चिदंबरम यांचा १०० पेक्षा जास्त दिवसांचा तुरुंगवास हा सूडबुद्धीचा आणि द्वेषपूर्ण होता. चिदंबरम यांना पारदर्शी सुनावणीत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करता येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, ‘माझे वडील घरी आले याबद्दल मी खूपच आनंदी आहे. त्यासाठी खूपच वाट पाहावी लागली. तो अनावश्यक तुरुंगवास होता.’ चिदंबरम यांचे वकील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनूसिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना ‘मोठ्या बोगद्यानंतर खूपच छान प्रकाश दिसावा’ असे म्हटले. पक्षाच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर जामीन निर्णयाचे ‘शेवटी सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते’ असे स्वागत केले गेले. पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काहीशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे. जामीन बराच आधी मिळायला हवा होता.’
काँग्रेस भ्रष्टाचार साजरा करतोय- भाजप
पी. चिदम्बरम हे जामीन मंजूर झाल्यामुळे ‘जामिनावर सुटलेल्यांच्या क्लबमध्ये’ दाखल झाले आहेत, असे सांगून भाजपने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या पक्ष भ्रष्टाचार साजरा करीत असल्याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘काँग्रेस भ्रष्टाचार साजरा करीत असल्याचे उत्तम उदाहरण. शेवटी चिदंबरमसुद्धा काँग्रेसमधील जामिनावर सुटलेल्यांच्या (आऊट आॅन बेल क्लब) लांबलचक यादीत दाखल झाले आहेत.