अभिनेत्रीच्या शोषणावरील आरोपात जामिन मिळाला तरी उद्योगपती बाहेर येईना; हायकोर्ट म्हणाले, ड्रामा नको...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 15:27 IST2025-01-15T15:27:31+5:302025-01-15T15:27:51+5:30
न्यायालयाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जामिनाचा आदेश वेबसाईटवर अलपोड केला. तर पावणेपाच वाजता आदेश जारी केले आहेत. तरीही चेम्मानूर तुरुंगातच होता.

अभिनेत्रीच्या शोषणावरील आरोपात जामिन मिळाला तरी उद्योगपती बाहेर येईना; हायकोर्ट म्हणाले, ड्रामा नको...
मल्याळम अभिनेत्री हनी रोज हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला प्रसिद्ध उद्योगपतीला मंगळवारी जामिन मंजूर केला. परंतू, हा उद्योगपती बाहेरच येत नसल्याने हायकोर्ट संतापले आहे. न्यायालयासोबत नाटके करू नका, असा दम न्यायालयाने भरला असून उद्योगपती बाहेर का आला नाही, याचे कारण समोर आले आहे.
न्यायालयाला उद्योगपती बॉबी चेम्मानूरचे वकील वेगळेच सांगत आहेत, तर उद्योगपती वेगळेच सांगत आहे. न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी चेम्मानूरला न्यायालय जसा जामिन देऊ शकते, तसा तो रद्दही करू शकते, असे म्हटले आहे.
न्यायालयाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जामिनाचा आदेश वेबसाईटवर अलपोड केला. तर पावणेपाच वाजता आदेश जारी केले आहेत. तरीही चेम्मानूर तुरुंगातच आहे. यावर वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, जेलमध्ये त्यांच्या वकिलांनी अद्याप आदेश दिलेला नाही. परंतू, चेम्मानूर बाहेर न येण्याचे कारण काही वेगळेच सांगत आहे.
चेम्मानूर ज्या तुरुंगात आहे, त्यात असे अनेक कैदी आहेत जे जामिन मिळाला तरी आतच अडकले आहेत. त्यांच्याकडे बाँड भरण्याचे देखील पैसे नाहीत. याला विरोध म्हणून मी तुरुंगातून बाहेर आलेलो नाही, असे चेम्मानूरच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.
चेम्मानूरच्या वकिलांचे हे म्हणणे ऐकून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तुम्हाला या गोष्टीची वकिली करण्याची गरज नाही. ते न्यायपालिकेचे काम आहे. न्यायालयासोबत नाटक करू नका. त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे. यामुळे त्यांनी हे नाटक सुरु केले आहे, असे म्हटले. न्यायालयाने फटकारल्यानंतर चेम्मानूर तुरुंगाबाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने त्या कैद्यांमुळे मी एक दिवस आणखी तुरुंगात राहिलो, असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.