EVM हॅकिंग: 'ती' पत्रकार परिषद काँग्रेसच्या सांगण्यावरूनच; भाजपाचे राहुल गांधीवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:22 PM2019-01-22T13:22:36+5:302019-01-22T13:25:25+5:30
कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवी दिल्ली - कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपानेकाँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. पत्रकार परिषदेचे आयोजक आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच काँग्रेसने या प्रकरणातून देशातील 90 कोटी मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान केला असून, देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये EVM हॅकिंग प्रकरणी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लंडनमधील ही पत्रकार परिषद काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. तसे नसते तर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे राजकारण होत आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले. अशा आरोपबाजीमधून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचे कारण शोधत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
Union Minister RS Prasad on y'day's event in London: What was Mr Kapil Sibal doing there? In what capacity was he present there? I believe he was monitoring the situation on behalf of Congress party. Is the Congress sponsored event designed to insult the popular mandate of 2014? pic.twitter.com/f6FMxm3oj7
— ANI (@ANI) January 22, 2019
रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- लंडनमधील ती पत्रकार परिषद काँग्रेस पुरस्कृत
- काँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान
- काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते
-गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूचे राजकारण
- 2014 साली आमचं नाही यूपीएचं सरकार होते सत्तेवर
- आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध
- आशीष रे यांनी लंडनमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली
लंडनमधील पत्रकार परिषदेत काय झाले होते आरोप
भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने सोमवारी खळबळजनक दावा केला होता. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला.
सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते.