Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:24 AM2021-04-30T06:24:55+5:302021-04-30T06:25:01+5:30
आसामात भाजप सत्ता राखणार, केरळात पुन्हा एलडीएफ
नवी दिल्ली : ऐन कोरोनाकहरात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया गुरुवारी समाप्त झाली. त्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षच सत्ता स्थापन करेल असा अंदाज सर्वच सर्वेक्षण संस्थांनी वर्तवला आहे.
तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुकला जनरोषाचा फटका बसेल तर आसाम आणि केरळात अनुक्रमे भाजप व माकपप्रणीत एलडीएफ सत्ता राखण्यात यशस्वी ठरतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. पुदुच्चेरीत मात्र सत्तेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
या विधानसभा निवडणूकांचे निकाल येत्या २ मे राेजी लागणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
भाजप मुसंडी मारणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये लाखालाखांच्या उपस्थितीत सभा घेतल्या. ममता बॅनर्जींनीही आक्रमक प्रचार केला. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. एक्झिट पोल्सनी बंगालमध्ये पुन्हा ममतांच्या तृणमूलचीच सत्ता येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, असे असले तरी भाजप १०० पेक्षाही अधिक जागा मिळवून मुसंडी मारण्याच्या तयारीत असल्याचे निष्कर्षांमध्ये दिसून येते.
पुदुच्चेरीत रस्सीखेच
अवघ्या ३० जागांच्या पुदुच्चेरी विधानसभेत भाजपप्रणीत रालोआ आणि काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तामिळनाडूत धक्का :
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाला पायउतार व्हावे लागेल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. तिथे द्रमुकला स्पष्ट बहुमत मिळून तो पक्ष सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.
आसामात भाजपच :
एनआरसी आणि सीएए या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती. या ठिकाणी भाजपच पुन्हा सत्तेवर मांड ठोकेल, असे भाकीत एक्झिट पोल्सनी वर्तवले आहे.
केरळात एलडीएफ :
मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ या माकपप्रणीत डाव्या आघाडीलाच पुन्हा पसंती मिळेल, असा अंदाज आहे. ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवत भाजपने केरळात जोर मारण्याचा प्रयत्न केला असला तरी मल्याळी जनतेला ते रूचलेले दिसत नाही.
प. बंगाल
संस्था तृणमूल भाजप डावी आघाडी
रिपब्लिक-सीएनएक्स १२८-१३८ १३८-१४८ ११-२१
इंडिया टुडे-ॲक्सिस १३०-१५६ १३४-१६० ०-२०
एबीपी सी-व्होटर १५२-१६४ १०९-१२१ १४-२५
टाइम्स नाऊ सी-व्होटर १५८ ११५ १९
जन की बात १०४-१२१ १६२-१८५ ३-९
ईटीजी रिसर्च १६४-१७६ १०५-११५ १०-१५
पी मार्क १५२-१७२ ११२-१३२ १०-२०
सीएनएन न्यूज१८ १६२ ११५ १५
टुडेज-चाणक्य १८० १०८ ४
तामिळनाडू
संस्था डीएमके+ एआयडीएमके+ एएएमके
रिपब्लिक-सीएनएक्स १६०-१७० ५८-६८ ४-६
टुडेज-चाणक्य १६४-१८६ ४६-६८ ०
पी-मार्क १६५-१९० ४०-६५ १-३
केरळ
संस्था एलडीएफ यूडीएफ एनडीए
रिपब्लिक-सीएनएक्स ७२-८० ५८-६४ १-५
इंडिया टुडे-ॲक्सिस १०४-१२० २०-३६ ०-२
पोल डायरी ७७-८७ ५१-६१ २-३पी-मार्क ७२-७९ ६०-६६ ०-३
आसाम
संस्था भाजप+ काँग्रेस+
रिपब्लिक-सीएनएक्स ७४-८४ ४०-५०
इंडिया टुडे-ॲक्सिस ७५-८५ ४०-५०
एबीपी सी-व्होटर ५८-७१ ५३-६६
टुडेज-चाणक्य ६१-७९ ४७-६५
पी-मार्क ६२-७० ५६-६४
पुदुच्चेरी
संस्था भाजप काँग्रेस
रिपब्लिक-सीएनएक्स १६-२० ११-१३