यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 12:48 IST2020-08-19T12:39:18+5:302020-08-19T12:48:24+5:30
लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही

यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
देशाच्या राजकारणातील फेसबुकच्या भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादाने मंगळवारी नवेच वळण घेतले. त्याचे कारण होते, तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारमधील माहिती व तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधी पक्षांसोबत होणाऱ्या गोपनीय बैठकांशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक होणे. या दस्तावेजांच्या आधारावर काँग्रेसने आपले जोरदार हल्ले करताना आरोप केला की, यूपीए सरकारला सत्तेतून दूर करण्याच्या कारस्थानात फेसबुक भाजपसोबत हातमिळवणी करून काम करीत होता.
हा दस्तावेज सार्वजनिक होताच राहुल गांधी यांनी ट्विट केले की, पक्षपात, खोट्या बातम्या आणि द्वेषाने भरलेल्या गोष्टींशी आम्ही कठीण संघर्ष करून लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही. वॉल स्ट्रीट जर्नलने खुलासा केला की, फेसबुक या प्रकारचे असत्य आणि द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहे आणि त्याबद्दल सगळ्या भारतीयांनी प्रश्न विचारला पाहिजे. राहुल गांधी यांनी त्यांच्या टष्ट्वीटसोबत पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी मार्क झुकेरबर्ग यांना लिहिलेले तीन पानी पत्रही दिले आहे.
षड्यंत्र रचण्यात फेसबुकचे साह्य घेतले जात होते...
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी असाच दस्तावेज सार्वजनिक केला आणि सिद्ध केले की, आंखी दास गुगल आणि यंग इंडियाच्या धोरण ठरवणाऱ्यांसोबत बोलत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुलासा. ‘आम्ही लोक दिवंगत अरुण जेटलीजींबाबत लिहितो आहोत. त्यावेळी जेटली विरोधी पक्षात होते. जी चिठ्ठी जेटली सरकारला लिहीत होते ती आम्ही ड्राफ्ट केली आहे.’
फेसबुक अरुण जेटलीजी यांचे म्हणणे भाजपचे एका वरिष्ठ नेत्याचे. ते एक विरोधी पक्षनेते होते. संसदेत त्यांची चिठ्ठी ड्राफ्ट कोण करीत होते, तर आंखी दास. फेसबुक करीत होता. का? विरोधी पक्ष कोणत्या मुद्यावर काय बोलेल, सरकारला काय लिहिणार, कसे घेरणार याचे षड्यंत्र रचण्यात त्यांचे साह्य घेतले जात होते, असे खेडा विचारतात.
खेडा यांनी असे अनेक खुलासे केले. त्यातून हे सिद्ध होत होते की, फेसबुक आणि व्हॉटस् अॅपची भारतातील शाखा भाजपशी हातमिळवणी करून मनमोहनसिंग सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याच्या षड्यंत्राचा भाग होते.