आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:42 PM2021-02-02T13:42:47+5:302021-02-02T13:45:17+5:30
६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळे ठोकण्यात येत आहे. यावरून आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला प्रश्न केले आहेत.
"आम्हाला तो फोन क्रमांक हवाय ज्यापासून आम्ही एका फोनच्याच दुरीवर आहोत. जेव्हा आपण यापूर्वी दिल्लीला जात होतो तेव्हाही रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले होते. आता आम्हाला दिल्लीला जायचंच नाही तर रस्त्यांवर खिळे का ठोकताय," असा सवाल टिकैत यांनी केला आहे. तसंच यामुळे जनतेला नाहक त्रास होईल, असंही ते म्हणाले.
"जेवढे जनतेचे रस्ते बंद होतील तितकंच त्यांनाही समजेल की त्यांच्या रस्त्यात कोण खिळे लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्नदात्याला संदूकीत बंद करण्याचा कट आहे. हे जनतेला आता समजलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही," असं टिकैत यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या महापंचायतीत येणाऱ्या नेत्यांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा एक मेळावा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे. परंतु या छिकाणी येऊन कोणी मतं मागत नाही. हे आंदोलन तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतही जाईल. ४-५ दिवसांत हे प्रकरण सोडवलं गेलं नाही तर हे आंदोलन पूर्ण वर्षभर सुरू राहिल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संयुक्त किसान मोर्चाकडूनही भाष्य
दिल्लीच्या सीमांवर करण्यात येत असलेल्या प्रवेशबंदीवरून संयुक्त किसान मोर्चानंही भाष्य केलं आहे. "जो पर्यंत आंदोलकांना पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर सरकारसोबत कोणतीही अधिकृत चर्चा केली जाणार नाही. निरनिराळ्या राज्यांमधून होत असलेल्या विरोध आणि वाढत असलेली ताकद यामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत," असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
राहुल-प्रियंका गांधींकडूनही टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.