तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ! राहुल गांधी म्हणाले, "जे बोललो, ते करून दाखवलं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 04:43 PM2024-06-22T16:43:07+5:302024-06-22T16:44:11+5:30
तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांवरील 31,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर सरकार १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे खुद्द मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले. यातच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शनिवारी तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, ‘तेलंगणातील शेतरी कुटुंबांना शुभेच्छा. काँग्रेस सरकारने आपले 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. यामुळे 40 लाखहून अधिक शेतकरी कुटुंब कर्ज मुक्त होतील. जे बोललो, करून दाखवलं, हीच नियत आहे आणि सवयही.’
47 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा -
राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस सरकारचा अर्थ, राज्याच्या तिजोरीतील पैसा शेतकरी, मजूर आणि वंचित समाजाला मजबूत करण्यासाठी खर्च होईल, याची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय त्याचे उदाहरण आहे. आमचे आश्वासन आहे की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे-तिथे भारताचा पैसा भारतीयांवर खर्च करेल, भांडवलदारांवर नाही."
तेलंगणा सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील जवळपास 47 लाख शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची रूपरेषा लवकरच अधिसूचित केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तेलंगणातील जनतेला आश्वासन दिले होते की, राज्यात आपले सरकार आल्यास आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. काँग्रेसला या आश्वासनाचा मोठा फायदा झाल्याचेही बोलले जाते. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कर्जमाफी योजना १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटले होते.