जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:02 PM2024-08-22T16:02:26+5:302024-08-22T16:04:12+5:30
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.
अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लवकरच जागावाटपाची घोषणा करू आणि जाहीरनामाही प्रसिद्ध करू. यावेळी, माध्यमांनी पीडीपीलाही सोबत आणण्यासंदर्भात केलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. ते म्हणाले, कुण्याही समविचारी पक्षासाठी आमचे दरवाजे बंद नाहीत. भविष्यात कुठल्याही मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच, विजयी झाल्यास मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर देणे टाळले.
येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला -
फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी आशा करतो की राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल. फारूक म्हणाले, आघाडीसंदर्भात आमची चर्चा सुरू आहे. यावर लवकरच काही निर्णय होईल. फुटिरतावादी शक्तींना एकत्रितपणे हाटवण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू. लवकरच जागांसंदर्भातही घोषणा होईल. तसेच, जम्मू-काश्मीरला लवकरच सर्व अधिकार मिळतील, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे, ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार, की त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला निवडणूक लढवणार? यासंदर्भात भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तत्पूर्वी, गेल्या लोकसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा दारूण पराभव झाला होता.
राहुल गांधी यांची एकत्रितपणे निवडणूक लढण्याची इच्छा -
तत्पूर्वी, जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "आम्ही येथे कार्यकर्त्यांना निवडणुकीची माहिती देण्यासाठी आलो आहोत. सर्व विरोधकांना सोबत घेऊन पुठे चालण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना खर्गे म्हणाले, "INDIA चा परिणाम आपण बघितला आहेत. आपण हुकूमशहाला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. त्यांना तीन कायदे मागे घेण्यासही भाग पाडले आहे."