VIDEO: ...अन् काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं राहुल गांधींना उभ्या उभ्या गंडवले; शेकडो लोक पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:43 PM2021-02-18T13:43:46+5:302021-02-18T13:44:40+5:30
महिलेनं तक्रार ऐकवली; मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना महिला कौतुक करत असल्याचं सांगितलं
पुद्दुचेरी: काँग्रेस नेते राहुल गांधींकडे (Congress Leader Rahul Gandhi) मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेच्या शब्दांचं चुकीचं भाषांतर केल्यानं भारतीय जनता पक्षानं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चक्रीवादळादरम्यान मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं नाही. उलट संबंधित महिला आपलं कौतुक करत असल्याचं नारायणसामी यांनी राहुल यांना सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."
पुद्दुचेरीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दोन दिवसांच्या पुद्दुचेरी दौऱ्यावर आहेत. काल राहुल गांधींनी मच्छिमारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री नारायणसामी राहुल गांधींसोबत होते. यावेळी सोलाई नगरच्या एका मच्छिमार महिलेनं नारायणसामी यांची तक्रार राहुल यांच्याकडे केली. आमच्या भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मात्र तरीही मुख्यमंत्री फिरकले नाहीत, अशी तक्रार महिलेनं केली.
Aandavan 🙏
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) February 17, 2021
CONgress leaders seem to be competing with Rahul Gandhi in telling lies !
Elderly Woman in Tamil: Government did not help us during cyclone.
Puducherry CM Narayanaswamy to Rahul: She is thanking me for visiting her during cyclone and providing relief 😂 pic.twitter.com/G503woWDQA
तक्रारदार महिला स्थानिक भाषेत बोलत होती. तिचं म्हणणं राहुल गांधींना समजावून सांगताना मुख्यमंत्री नारायणसामींनी चुकीचं भाषांतर केल्याचा दावा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केला आहे. 'कोणीही आम्हाला मदत केली नाही. त्यांनीही (मुख्यमंत्री नारायणसामी) आमच्या भागाला भेट दिली नाही,' असं मच्छिमार महिला म्हणाली. याचं भाषांतर करताना मुख्यमंत्र्यांनी लबाडी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 'निवार चक्रीवादळ आलं असताना मी त्या भागाला भेट दिली. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली, असं तिला सांगायचं आहे,' असं नारायणसामींनी राहुल गांधींना सांगितलं.
सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!
राहुल गांधींना चुकीचं भाषांतर करून सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'मी काहीही चुकीचं सांगितलं नाही. तुम्ही असे प्रश्न का विचारता?', असा उलट प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी जोरदार टीका केली. 'राहुल यांच्या पुद्दुचेरी दौऱ्यातला आणखी एक खोटारडेपणा. वृद्ध महिला मुख्यमंत्र्यांना चक्रीवादळग्रस्त भागाकडे पाठ फिरवल्याचं सांगते आणि राहुल यांचे मुख्यमंत्री त्यांना मी त्यांच्या भागात जाऊन मदत केल्याचं चुकीचं भाषांतर ऐकवतात,' असं चंद्रशेखर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.