“राहुल गांधींना शक्ती अन् भक्ती काय आहे, हेच माहिती नाही”; माजी काँग्रेस नेत्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:18 PM2024-03-18T15:18:28+5:302024-03-18T15:19:21+5:30
Congress Acharya Pramod Krishnam: राहुल गांधी यांनी एकदाच स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा माजी काँग्रेस नेत्याने केली आहे.
Congress Acharya Pramod Krishnam: भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता करताना झालेल्या एका मोठ्या सभेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या नेत्यांवर टीका केली. राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून पलटवार होत असताना काँग्रेसच्या माजी नेत्यांनी राहुल गांधी यांना काही प्रश्न विचारले आहेत.
राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थांमध्ये राजाचा आत्मा आहे. ईव्हीएम शिवाय राजा निवडणूक जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले विरोधी पक्षांना या मशिन खोलून दाखवा, त्या कशा चालतात ते आमच्या तज्ज्ञांना दाखवा. मशिनमधून जी कागदाची चिठ्ठी निघते, त्याची मोजणी करा, पण निवडणूक आयोग नाही म्हणते. या सिस्टिमला त्याची मोजणी नको आहे. लोक विचार करतात की, आम्ही सगळे भाजपविरोधात, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीविरोधात लढत आहोत, पण तसे नाही. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी टीका केली.
राहुल गांधींना शक्ती आणि भक्ती काय आहे, आदिशक्ती काय आहे, हेच माहिती नाही
राहुल गांधींना स्वतःलाच माहिती नाही की, ते काय बोलत आहेत. राहुल गांधींना हेही माहिती नाही की, ते असे का बोलत आहेत. पण राहुल गांधींना त्याचे काही नाही. राहुल गांधींना शक्ती आणि भक्ती काय आहे, आदिशक्ती काय आहे, हेच माहिती नाही. राहुल गांधी यांच्या आजूबाजूला असे काही लोक आहे, जे त्यांना बरबाद करत आहेत. त्यांना कोणीतरी एखादा कागद हातात देते आणि ते विमानात बसून वाचतात. खाली उतरल्यावर काय वाचले हे त्यांच्या कधी लक्षात राहते, कधी ते विसरतात. आपण जे बोलतो ते का बोलतो, त्याचा अर्थ काय, याचा विचार सर्वांत आधी राहुल गांधी यांनी करायला हवा, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी हिंदुत्वाविरोधात लढू इच्छितात का, हिंदुत्वाची शक्ती संपुष्टात आणू पाहतात का, सनातनाविरोधात लढायचे आहे का, असा सवाल करत, एकदाच काय ते राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत सांगायला हवे की, ते भाजपाविरोधात आहेत की हिंदू धर्माविरोधात आहेत, अशी विचारणा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे.