...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 09:42 AM2020-05-02T09:42:12+5:302020-05-02T09:42:31+5:30
बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली: मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला होता. २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं. बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर ४१ दिवसांनंतर कमलनाथ यांनी सरकार वाचवण्यात का अपयश आलं याबाबत एक नवा खुलासा केला आहे.
कमलनाथ यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची काही आमदारांसोबत दिवसातून तीन वेळा बोलणं व्हायचं. तसेचकाही आमदारांनी आम्हाला पतर येणार असल्याचे सांगितले होते. आमदारांनी आम्हाला विश्वास दिला होता. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहिलो. त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवल्यानंच आम्हाला सरकार वाचवता आलं नाही, असा खुलासा कमलनाथ यांनी केला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे जुलैपासून भाजपशी संपर्कात होते-
लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेभाजपाच्या संपर्कात होते असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. लोकसभेत एक लाखाहून अधिक मतांनी झालेला पराभव त्यांना पचवता आला नाही, त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला असं कमलनाथ यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीत कॉंग्रेस 15 पेक्षा जास्त जागा जिंकेल-
कमलनाथ यांनी मध्य प्रदेश पोटनिवडणुकीबाबतही अनेक दावे केले. ते म्हणाले की, हा आकडेवारीचा खेळ आहे. सध्या आमच्याकडे 92 आमदार आहेत आणि भाजपाकडे 107 आमदार आहेत. 24 जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. यात किमान 15 जागा आम्ही जिंकू असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.