राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:43 PM2018-07-23T14:43:06+5:302018-07-23T14:43:34+5:30
2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बंगळुरू - 2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतला आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींची दावेदारी भक्कम झाल्याचे मानण्यात येत आहे.
राहुल गांधीना गैर भाजपाई दलांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याबाबत प्रतिक्रिया देताना देवेगौडा म्हणाले, "राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास त्यांचा पक्ष तयार आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही." कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेगौडा यांचे पुत्र एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.
राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली होती. तसेच या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यावरही जोर देण्यात आला. तसेच सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते असल्याने राहुल गांधी यांनाच आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्यात यावा यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान आग्रही मागणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
2019 साठी काँग्रेसचे मिशन ३००
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आक्रमक पद्धतीने मैदानात उतरणार असून, किमान ३०० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी १२ राज्यांतील १५० जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकतो, असा दावा केला. या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचे सर्वाधिकार कार्यकारिणीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना दिले. देशाच्या १२ राज्यांमध्ये काँग्रेसला चांगला जनाधार आहे. आणखी ताकद लावली, तर तिथे किमान १५० जागा मिळू शकतील, असे चिदम्बरम यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण १५० जागा जिंकल्यास यूपीएची केंद्रात सत्ता येणे शक्य आहे, कारण यूपीएमधील अन्य राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आणखी १५० जागा सहज जिंकू शकतील, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.