“मोदींवरील भाष्य अत्यंत वेदनादायी”; ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवेंनी राहुल गांधींना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:51 PM2023-08-08T16:51:36+5:302023-08-08T16:54:38+5:30
Harish Salve And Rahul Gandhi: देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहताना अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? असा विचार राहुल गांधींनी करायला हवा, असे हरीश साळवेंनी म्हटले आहे.
Harish Salve And Rahul Gandhi: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर आता राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थानही देण्यात आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. यातच देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींना चांगलेच सुनावले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाच्या शिक्षेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विरोधी पक्षांनी जोरदार स्वागत केले. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यातच एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरीश साळवे यांनी याविषयी अत्यंत परखड शब्दांत मत मांडले. सार्वजनिक जीवनात अशा प्रकारे वक्तव्य करणे हे राहुल गांधींकडून अपेक्षित नाही, असे हरीश साळवे यांनी म्हटले आहे.
एका बाजूला देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न अन् दुसऱ्या बाजूला...
मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी जे काही वक्तव्य केले, त्यासाठी त्यांना दोषी ठरवले जावे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र कुणाविषयी टिप्पणी करताना अशा पद्धतीची भाषा वापरणे हे अत्यंत वाईट आणि वेदनादायी आहे. लोकांवर खोटे आरोप करता आणि सांगता की मी सार्वजनिक आयुष्यात आहे. मात्र राहुल गांधी हे रात्री झोपताना हा विचार करत असतील का? की भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतो आहे तर मी अशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे का? असा सवाल हरीश साळवे यांनी केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली असली तरी त्यावेळी हेही सांगितले की, जे तुम्ही बोललात ते चुकीचे आहे. अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही करायला नको होते. अद्याप सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही फक्त गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, असे हरीश साळवे यांनी स्पष्टपणे सांगितले.