काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षासोबत चार उपाध्यक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:04 AM2019-07-13T05:04:21+5:302019-07-13T05:04:32+5:30
घडामोडी वाढल्या : नवे सूत्र घेत आहे आकार
नवी दिल्ली : कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर १५० वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात गेल्या ५० दिवसांपासून अध्यक्षपदावरून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी एक सूत्र (फार्म्युला) आकार घेत आहे.
मिळालेली माहिती खरी मानली तर ‘एक अधिक चार’ सूत्राला अंतिम रूप दिले जात आहे. राहुल गांधी यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोकळी निर्माण झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत ए. के. अँटोनी, डॉ. मनमोहनसिंग व इतर दोघे यांच्यात अनेकदा चर्चा झाली व त्यातून वन प्लस फोर फार्म्युल्याला पसंती मिळत आहे. हे सूत्र असे आहे की पक्षाच्या घटनेनुसार निवडणुका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हंगामी अध्यक्ष काँग्रेस कार्यकारी समितीकडून नियुक्त केला जावा. सीडब्ल्यूसीची बैठक पुढील आठवड्यात केव्हा तरी बोलावली जाईल हे स्पष्ट आहे. कारण या सूत्राने आकार घेतला असून त्याचा
आवश्यक तपशील निश्चित केला जात आहे.
राहुल गांधी गेल्या आठवड्यात त्यांच्या अत्यंत विश्वासू लोकांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे ही चार उपाध्यक्षांची कल्पना मांडली. या उपाध्यक्षांत प्रियांका गांधी (उत्तर), गौरव गोगोई (ईशान्य), मुकुल वासनिक (पश्चिम) किंवा ज्योतिरादित्य शिंदे आणि के. सी. वेणुगोपाल (दक्षिण) आहेत. वेणुगोपाल हे लोकसभा निवडणुकीत केरळ आणि तमिळनाडुचे प्रभारी होते व त्यांना लक्षणीय यशही मिळाले.