काँग्रेससाठी आजचा दिवस महत्त्वाचा, G-23चे नेते ताकद दाखवणार; नेतृत्त्वाच्या अडचणी वाढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:09 AM2021-02-27T08:09:23+5:302021-02-27T08:12:03+5:30
g 23 leader in congress will come together in jammu today: राहुल गांधी देशाच्या एका टोकाला असताना G-23चे नेते देशाच्या दुसऱ्या टोकाला एकत्र येणार
नवी दिल्ली: काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून देण्यात आलेला निरोप आणि राहुल गांधींनी नुकतंच केलेलं 'उत्तर-दक्षिण' विधान या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे वरिष्ठ नेते जम्मूत एकत्र येत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी तमिळनाडूत आहेत. राहुल देशाच्या एका टोकाला असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते देशाच्या दुसऱ्या टोकाला एकत्र येणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. (g 23 leader in congress will come together in jammu today)
राहुल गांधींचे एब्स पाहिले का? ऑलिंपिक विजेत्या खेळाडूनंही केलंय कौतुक
काँग्रेसमध्ये २३ नेतांचा एक गट आहे. हा गट G-23 नावानं ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी या गटानं काँग्रेसच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले होते. या गटाचे नेते आज जम्मूत एकत्र येत आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल हे नेते जम्मूत पोहोचले आहेत. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार विवेक तन्खा आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारीदेखील जम्मूत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
"काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते, लोकांची स्वप्न भंग केली अन् त्यांना धोका दिला", पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज जम्मूत गांधी ग्लोबल फॅमिली नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यक्रमासाठी एकत्र येत आहेत. गुलाम नबी आझाद या संस्थेचे प्रमुख आहेत. पक्षातले असंतुष्ट नेते पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेत्यांचा जम्मू दौरा अधिकृत नसल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
'आम्ही या नेत्यांना जम्मूचा दौरा करण्यास सांगितलेलं नाही. पक्षाच्या नेतृत्त्वानं जम्मूचा दौरा करण्यासाठी नियुक्तदेखील केलेलं नाही. पण आझाद साहेबांच्या जम्मू दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना जम्मू-काश्मीरच्या काँग्रेस कमेटी कार्यालयात नेत्यांना भेटण्यास सांगितलं,' अशी माहिती सुत्रांनी दिली. राहुल गांधींनी नुकत्याच केलेल्या 'उत्तर-दक्षिण' विधानावर काँग्रेसमधील असंतुष्ट नेते नाराज आहेत. गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात न आल्यानंसुद्धा G-23चे नेते नाराज असल्याचं समजतं.