गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:27 AM2019-05-26T06:27:17+5:302019-05-26T06:27:54+5:30

लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

Gandhiji's party chief, Rahul Gandhi | गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

Next

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याशिवाय असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी राहुल यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला असला तरी राहुल आपल्या निर्धारावर ठाम आहेत.
कॉँग्रेसने निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यामुळे यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी सांगितले. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले.
काँग्रेसच्या अपयशामागील कारणांची व राहुल गांधी यांनी सादर केलेला राजीनामा यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यास काही सदस्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव सुचवले. मात्र पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला. त्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी ए. के. अ‍ॅन्टोनी, कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे चर्चेत आली.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्याबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. या राज्यांमध्ये कॉँग्रेसची सत्ता असतानाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येथील मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका सदस्यांनी केली. त्यामुळे अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल यांचे भवितव्य धोक्यात आहे.
बैठकीत कॉँग्रेस अध्यक्षांना संघटनेत बदल करण्याचे सर्वाधिकार बहाल करण्यात आले. त्याचबरोबर येत्या महिन्या-दोन महिन्यांत प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांमध्येही बदल होणार असल्याचे सूतोवाच या वेळी करण्यात आले. याशिवाय पक्षावर कब्जा केलेल्यांनाही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या सोशल मीडियावरील प्रचारापेक्षा कॉँग्रेसचा प्रचार कमी पडत असल्याचे अनेक सदस्यांनी यावेळी सांगितले. कॉँग्रेसने या बाबीकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता अनेक सदस्यांनी बोलून दाखविली. भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने सोशल मीडियावर अधिक सक्रिय होण्यावर अनेकांनी भर दिला.
बैठकीमध्ये संसदेत आणि बाहेरही सरकारला कैचीत पकडण्यासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करून धोरण निश्चित करण्याची गरज अनेक सदस्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या मूलभूत रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे सारे अधिकार पक्षाध्यक्षांना कार्यकारिणीने दिले आहेत. लोकसभा निवडणुकांत जनतेने दिलेला कौल काँग्रेसने विनम्रतेने स्वीकारला आहे. काँग्रेसला मत देणाऱ्या मतदारांचे पक्षाने आभार मानले आहेत. यापुढेही काँग्रेस जबाबदार व सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभावत राहील, असेही त्यांनी सांगितले.
>लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या.

Web Title: Gandhiji's party chief, Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.