निवडणूक न होऊ देणारे आज लोकशाहीचे धडे देऊ पाहातायत; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
By मोरेश्वर येरम | Published: December 26, 2020 04:44 PM2020-12-26T16:44:55+5:302020-12-26T16:46:45+5:30
"पदुच्चेरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होऊ न देणारे आज दिल्लीत बसून आम्हाला लोकशाहीचे धडे देऊ पाहत आहेत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली
देशात लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"पदुच्चेरीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होऊ न देणारे आज दिल्लीत बसून आम्हाला लोकशाहीचे धडे देऊ पाहत आहेत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पदुच्चेरीमध्ये पंचायत आणि पालिका निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही काँग्रेसशासित पदुच्चेरीमध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. "सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही पदुच्चेरीमध्ये सत्तेत असलेले लोक पंचायत आणि पालिका निवडणुका होऊ देत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांमुळे लोकशाही बळकटी मिळाली आहे. जम्म-काश्मीरच्या जनतेने विकासाची कास धरत घराबाहेर पडून मतदान केलं. इतके वर्ष सत्तेत असूनही सीमेवरील भागात विकास न करणं ही खूप मोठी चूक काँग्रेसनं केली आहे", असं मोदी म्हणाले.
'आयुष्मान भारत' योजनेबाबत काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी 'आयुष्मान भारत' योजनेची सुरुवात केली. जम्मू-काश्मीरमधील जनतेला या योजनेतून होणाऱ्या फायद्यांबाबत मोदींनी भाष्य केलं.
"आयुष्मान भारत योजनेतून जम्मू-काश्मीरमधील जनतेला फक्त जम्मू-काश्मीरमधीलच नव्हे, तर देशातील असंख्य रुग्णालयांमध्ये याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला देशातील हजारो रुग्णालयांना जोडण्यात आलं आहे. त्यातील कोणत्याही रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे", असं मोदी म्हणाले.
"गेल्या दोन वर्षात दीड कोटीपेक्षा अधिक गरीब नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनाही कठीण काळात या योजनेचा फायदा झाला आहे. येथील १ लाख लोकांना आजवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता आले आहेत", असंही मोदी पुढे म्हणाले.