Ghulam Nabi Azad: गुलाम नबी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता; 4 महिन्यांपूर्वीच झाले होते ‘आझाद’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 07:24 PM2022-12-30T19:24:46+5:302022-12-30T19:24:55+5:30
Ghulam Nabi Azad News: पक्ष नेतृत्वावर टीका करुन पक्षाबाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होऊ शकते.
Ghulam Nabi Azad News: चार महिन्यांपूर्वी काँग्रेस नेतृत्वावर टीका करुन पक्षाबाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनिया गांधींच्या निकटवर्तीय अंबिका सोनी आझाद यांच्या संपर्कात आहेत. सुरुवातीला आझाद यांना भारत जोडो यात्रेत सामील केले जाईल, नंतर त्यांची घरवापसी होईल.
26 ऑगस्ट 2022 रोजी आझाद यांनी राहुल गांधींसह पक्ष नेतृत्वावर टीका करुन पक्ष सोडला होता. यानंतर त्यांनी स्वतःचा 'आझाद डेमोक्रॅटिक पार्टी' नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमध्येही फूट पडली आणि अनेक ज्येष्ठ नेते आझाद यांच्यासोबत आले. पण 'आझाद डेमोक्रॅटिक पार्टी' स्थापन होऊन चार महिन्यांतच फूट पडू लागली आहे. एकापाठोपाठ एक अनेक नेते आझाद यांना सोडून काँग्रेसमध्ये परतले आहेत. आझाद राजकीयदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे काँग्रेसमध्ये परतण्याबाबत विचार करत आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. यानंतर आझाद यांच्यावरील दबावही वाढला आहे. काँग्रेसविरोधात बंड केलेले त्यांचे इतर काही मित्रही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. गुलाम नबी आझाद यांनीही भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन स्वगृही परतावे, असे अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते त्यांना सांगत आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जयराम रमेश यांनीही आझाद यांना संदेश पाठवला आहे.