राहुल गांधींच्या टीममध्ये निर्णय घेणारा 'तो' बॉडीगार्ड कोण?; आझादांनी केला होता आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 09:15 PM2022-08-27T21:15:10+5:302022-08-27T21:15:38+5:30
गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलेला सुरक्षा रक्षक कोण आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी तब्बल पाच दशकांनंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसशी संबंध तोडण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. देशातील सर्वात जुना पक्ष आता "पूर्णपणे नष्ट" झाला आहे असा दावा त्यांनी केला. पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अंतर्गत निवडणुकांच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचा आरोप आझाद यांनी केला.
त्याचसोबत पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपरिपक्व आणि बालिश वर्तनाचा आरोपही त्यांनी केला. आझाद म्हणाले की, आता सोनिया गांधी या केवळ नाममात्र नेत्या आहेत कारण राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक आणि पीए हे निर्णय घेतात. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलेला सुरक्षा रक्षक कोण आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याशिवाय गुलाम नबी आझाद यांनी राहुल यांच्या वर्तुळातील नेत्यांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या आठ वर्षांत नेतृत्वाने गंभीर नसलेल्या व्यक्तीला पक्षावर लादण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हे सर्व घडल्याचा आरोप आझाद यांनी केला. काँग्रेस गुंडांच्या आश्रयाने चालवली जात आहे. आझाद यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते राहुल मंडळीतील कोण आहेत? हे जाणून घेऊया.
राहुलच्या सुरक्षेची जबाबदारी बायजूकडे
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या राजीनाम्यात सुरक्षा रक्षकाचा उल्लेख केला आहे, ती व्यक्ती केबी बायजू असावी. रिपोर्टनुसार, बायजू हे आधी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा भाग होते. राहुल गांधी पक्षात सरचिटणीस बनल्यानंतर ते सक्रीय झाले. बायजू यांनी काँग्रेसमध्ये कोणतेही औपचारिक पद भूषवले नाही, परंतु पक्षातील त्यांचा दर्जा वाढतच गेला. बायजू राहुल गांधींच्या सुरक्षेशिवाय महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घेतात. यामध्ये राहुल गांधी यांच्या या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या गोवा दौऱ्याचा समावेश आहे. आता ही व्यक्ती भारत जोडो यात्रेचाही महत्त्वाचा भाग आहे. काँग्रेस नेत्यांनुसार, बायजू राहुल गांधींचा प्रवास सांभाळत असल्याने ते बऱ्यापैकी शक्तिशाली झाले आहेत. कोणत्या व्यक्तीने राहुल गांधींसोबत किती वेळ घालवायचा हे बायजूच ठरवतात. एवढेच नाही तर ते राहुल गांधींसोबत स्टेजही शेअर करतात.
'टीम राहुल'मधील वेणुगोपालांवरही अप्रत्यक्ष निशाणा
आझाद यांनी राजीनामा पत्रात राहुल गांधींच्या भोवताळील चौकडीचा उल्लेख केला आहे. यात अप्रत्यक्षपणे केसी वेणुगोपाल यांना लक्ष्य करण्यात आलं. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधींसाठी खूप खास आहेत. २०१७ मध्ये वेणुगोपाल यांची सरचिटणीस पदावर बढती करण्यात आली. त्याच वर्षी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षही झाले. वेणुगोपाल यांच्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण असा समज नेत्यांमध्ये होता. त्यामुळे आझाद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असायचे. ज्याप्रकारे गुलाम नबी आझाद, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या जवळचे होते. तसेच राहुल यांच्या टीममधील लोकांना त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे. राहुल गांधींच्या टीममध्ये रणदीप सिंग सुरजेवाला आणि अजय माकन यांचाही समावेश आहे.