गुलाम, शिंदे, हिमंता... अदानी; राहुल गांधींनी पझलमधून ते २०००० कोटी कोणाचे, हे पुन्हा विचारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:11 PM2023-04-08T16:11:41+5:302023-04-08T16:12:22+5:30
अदानींच्या आडनावात किती नावे लपलित? राहुल गांधी यांनी आपल्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. हे नेते आता भाजपात गेलेत.
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अदानींवर टीका करण्यात काही अर्थ नाही असे सांगितले असताना तिकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ड पझलमधून अदानींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही लोकांची नावे-आडनावे जोडून ते २० हजार कोटी रुपये कोणाचे असा प्रश्न पुन्हा विचारला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
आज राहुल गांधी यांनी एक शब्द कोड्याचा फोटो पोस्ट केला. त्यात अदानी असे मोठ्या अक्षरात आहे. परंतू, त्यानंतर जी नावे त्यांनी जोडली आहेत, त्यावरून हे लोक माजी काँग्रेसी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हे लोक आता भाजपात गेले आहेत. या लोकांनी राहुल यांची साथ सोडली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असल्याचेही अंदाज लावले जात आहेत.
कोणाकोणाचे नाव?
यामध्ये राहुल यांनी कोणाचे थेट पूर्ण नाव घेतलेले नाहीय. परंतू, ट्विट करताना त्यांनी ''खरे लपवत आहेत, म्हणून रोज भटकवत आहेत. प्रश्न तेच आहेत. अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटींचा काळा पैसा कोणाचा आहे?'' असा सवाल केला आहे. नावांवरून तरी राजकीय वर्तुळात हेच लोक असल्याचे बोलले जात आहे.
यामध्ये गुलाम, सिंधिया, किरण, हिमांता, अनिल अशी नावे ADANI मध्ये खाली वर जोडली आहेत. यानुसार हे नेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिश्व शर्मा आणि अनिल अँटोनी अशी नावे असतील असा अंदाज आहे.
अनिल अँटोनी यांनी यावर लगेचच पलटवार केला आहे. मोठ्या नेत्यांसोबत माझे नाव घेतल्याने मी खूश आहे. तुम्ही जी नावे लिहिलात ती गद्दारांची नाहीत. हे लोक कुटुंबासाठी नाही तर देशासाठी काम करणारे लोक आहेत, असे ट्विट अनिल यांनी केले आहे.