"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे
By बाळकृष्ण परब | Published: January 13, 2021 03:33 PM2021-01-13T15:33:46+5:302021-01-13T15:37:09+5:30
Girls age of marriage News : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे.
भोपाळ - मुलींच्या वयाचे वय १८ वरून वाढवून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी, असे विधान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले होते. चौहान यांच्या या मतावर टीका करताना काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशमधील माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. आधीच विवाहाचे वय १८ निश्चित केले आसताना ते वय तेवढेच का राहू दिले जाऊ नये, असे विधान सज्जन सिंह वर्मा यांनी केले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्याबाबत चर्चा व्हायला हवी, असे विधान केले होते. अनेकदा मला वाटते की, समाजामध्ये मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याबाबत चर्चा व्हायला हवी. मी याला चर्चेचा मुद्दा बनवू इच्छितो. राज्य आणि देशाने यावर विचार करावा, म्हणजे यावर काही निर्णय घेता येईल, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले होते.
राज्यस्तरीय सन्मान अभियानाची सुरुवात करताना त्यांनी हे विधान केले होते. या अभियानाचा उद्देश महिलांविरोधातील गुन्ह्यांचे निर्मुलन करण्यासाठी समाजाची सक्रिया भागिदारी निश्चित करणे, महिला आणि मुलींसाठी सन्मानजनक आणि अनुकूल वातावरण तयार करणे आणि सर्वसामान्य लोकांसाठी कायदेशीर तरतुदींबाबत जागरुक करण्याचे आहे. मध्य प्रदेशमध्ये गुन्हेगारांवर अंकुश लावण्याचे कार्य पूर्ण क्षमतेने केले जाईल. सर्वसामान्यांना कायद्याच्या राज्याची जाणीव करून दिली जाईल, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.