आरोपाचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, राम मंदिर देणगीवरुन राजकारण तापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:33 PM2021-02-02T16:33:02+5:302021-02-02T16:34:16+5:30
भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे
झाबुआ - अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. त्यावरुन, काग्रेस नेत्यांनी वर्गणी घेणाऱ्या भाजपा समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. झाबुआ मतदारसंघाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिराच्या देणग्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. आता, या आरोपावरुन चागंलचं राजकारण तापलं असून भाजपा नेत्यांनीही काँग्रेस आमदाराच्या टीकेला पलटवार केला आहे.
भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे. कांतिलाल भूरिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी केंद्रात दोन वेळा मंत्रिपद भूषवले आहे. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले भूरिया आताच्या घडीला मध्य प्रदेशातील झाबुआ मतदारसंघाचे आमदार आहेत. भूरिया यांच्या आरोपावरुन मध्य प्रदेशातील भाजपा नेते आणि प्रवक्ता रामेश्वर शर्मा यांनी पलटवार केला आहे. भूरिया यांचे आरोप निराधार आहेत, राम मंदिरासाठी जमा होणार निधी, दान थेट श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बँक अकाऊंटमध्ये जाते, असे शर्मा यांनी सांगितले.
The donations go directly to the bank account of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra: Madhya Pradesh Protem Speaker Rameshwar Sharma https://t.co/YoMyzzEjMApic.twitter.com/5iISMy1Psb
— ANI (@ANI) February 2, 2021
भाजपा अनुसूचित जाती-जमातीचे प्रदेशाध्यक्ष कलसिंह बाबर यांनी भूरिया यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे आव्हान दिलंय. तसेच, मंदिर उभे राहत असल्याने भूरिया गोंधळून गेले आहेत, त्यामुळेच अशी विधानं करत आहेत. भूरिया यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, अन्यथा भाजपाची माफी मागावी, असेही बाबर यांनी म्हटलंय.
सचिन सावंत यांचाही गंभीर आरोप
राम मंदिरासाठीचा निधी लुबाडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीच आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल, याची खबरदारी घ्यावी. आजवर गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला. भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरिता याअगोरदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विश्व हिंदू परिषदे तर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही किंवा याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही. यासंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाला ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती, असेही सावंत यांनी म्हटले आहे.