राहुल गांधींच्या भाषणापासून प्रेरित होऊन गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 07:54 PM2018-03-20T19:54:43+5:302018-03-20T19:58:09+5:30
ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्यासाठी व्यासपीठ खाली करावे आणि पुढील सूत्रे त्यांच्याकडे सोपवावीत.
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच पक्षाच्या महाविधेशनाच्या व्यासपीठावरुन केलेल्या भाषणापासून प्रेरणा घेत गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी राजीनामा दिला आहे. राहुल यांनी रविवारी केलेल्या भाषणात पक्षातील नेत्यांना काही सल्ले दिले होते. राहुल यांनी म्हटले होते की, पक्षाच्या नेत्यांनी पारंपारिक चौकटी तोडाव्यात. ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्यासाठी व्यासपीठ खाली करावे आणि पुढील सूत्रे त्यांच्याकडे सोपवावीत, असे राहुल यांनी म्हटले होते. त्यांच्या या बोलण्यामुळे प्रेरित होऊन मी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे शांताराम नाईक यांनी सांगितले.
नव्या पिढीने पुढे येऊन पक्षाचे नेतृत्त्व केले पाहिजे, या राहुल गांधींच्या विधानाने मी प्रेरित झालो. मी महाविधेशनाच्यावेळीच आपल्या पदाचा राजीनामा देणार होतो. परंतु, ते योग्य ठरले नसते. त्यामुळे मी आज ई-मेल करून राहुल आणि सोनिया गांधी यांना माझा राजीनामा पाठवला. मी नेहमीच पक्षाच्या आणि पक्षनेतृत्त्वाच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन, असे नाईक यांनी सांगितले. शांताराम नाईक यांनी यापूर्वी राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
गेल्यावर्षी गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष लुईझिन्हो फलेरियो यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्याजागी शांताराम नाईक यांची वर्णी लागली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपला उत्तराधिकारी कोण असेल, याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. परंतु, प्रदेशाध्यक्ष दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून पक्षात असावा आणि त्याला पक्षाविषयी प्रेम असावे, या आपल्या अपेक्षा असल्याचे नाईक यांनी सांगितले.