...म्हणून स्वामी सतत म्हणताहेत, 'राहुल गांधी भारतीय नाहीतच!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 05:24 PM2019-04-30T17:24:04+5:302019-04-30T17:31:36+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो आहे. राहुल गांधी ब्रिटिश आहेत की भारतीय, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गाधींच्या नागरिकत्वाबाबत भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
आता केंद्रीय गृह मंत्रालयानेही राहुल गांधी यांच्याकडे याप्रकरणी नोटीस पाठविली आहे. राहुल गांधी हे ब्रिटीश आहेत, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांचा आहे. तर राहुल गांधी जन्मजात भारतीय असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
- चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत मुद्द्या उपस्थित केला होता. राहुल गांधी ब्रिटीश नागरिक आहेत. त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व आणि खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली होती.
- जानेवारी 2016 मध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी महेश गिरी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत स्पष्टीकरण मागितले होते. यानंतर एक सल्लागार समिती नेमण्यात आली आणि पूर्ण चौकशी झाली. यावर राहुल गांधी यांना उत्तर द्यावे लागले होते. समितीला दिलेल्या उत्तरात राहुल गांधींनी म्हटले होते, 'माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. मी कधीही ब्रिटीश नागरिकत्व मागितले नाही आणि स्वीकारलेही नाही.'
- सप्टेंबर 2017 मध्ये हा मुद्द्या पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटकरुन खळबळ उडवून दिली होती. तसेच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना याप्रकणी पत्र लिहिले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या काळातच गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांनी याप्रकरणी नोटीस पाठवून 15 दिवसांत उत्तर मागितले आहे.
काय आहे सुब्रमण्यम स्वामींचा तर्क?
सुब्रमण्यम स्वामींनी केंद्रीय गृहमंत्रालयाला सांगितले आहे की, 2003 मध्ये युनायटेड किंगड्ममध्ये रजिस्टर्ड Backops Limited कंपनीचे राहुल गांधी संचालक आहेत. तसेच, या कंपनीचे ते सचिव सुद्धा आहेत. तक्रारीत असेही म्हटले आहे की 2005 व 2006 मध्ये कंपनीद्वारा फाईल करण्यात आलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधी यांची जन्म तारीख 19/06/1970 दाखविण्यात आली आहे आणि नागरिकत्व ब्रिटीश असल्याचे घोषित केले आहे.
कायदा काय सांगतो?
भारतीय कायद्यानुसार, कोणताही नागरिक केवळ एकच नागरिकत्व ठेवू शकतो. जर तो भारताचा नागरिक आहे. तर तो इतर कोणत्याही देण्याचं नागरिकत्व ठेवू शकत नाही. भारतात दोन नागरिकत्वाला मान्यता नाही. म्हणजेच, कोणताही विदेशी नागरिक खासदार सुद्धा होऊ शकत नाही.
Ministry of Home Affairs issues notice to Congress President Rahul Gandhi over his citizenship after receiving a complaint from Rajya Sabha MP Dr Subramanian Swamy; MHA asks Rahul Gandhi to respond in the matter within a 'fortnight'. pic.twitter.com/rkFu6TJ7lu
— ANI (@ANI) April 30, 2019
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आला असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
(राहुल गांधींना गृह मंत्रालयाकडून नोटीस, पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश)
याआधी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला होता. याच बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले होते.
(राहुल गांधींच्या नोटिसीमागे राजकीय हेतू नाही, राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण)
उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी आहे. अमेठीहून राहुल गांधी तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.