'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:29 PM2024-02-13T16:29:22+5:302024-02-13T16:48:51+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा दिल्लीकडे आंदोलनासाठी कूच केली आहे. आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आज दिवसभरात तीन वेळा शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या आहेत, दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे. 'इंडिया आघाडीचे सरकार आल्यास MSP ची हमी', असं ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक! स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांवर किमान MSP कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे', असं या पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे.
आज काँग्रेसची न्याययात्रा अंबिकापूर येथे आहे, यावेळी संबोधित करताना गांधी म्हणाले, 'मणिपूर भाजपने जाळले. आम्ही आदिवासी भागात जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. चिनी उत्पादने भारतात विकली जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. भारत जोडो यात्रेसाठी प्रत्येक राज्यातून लाखो लोक आले आहेत. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडावे लागेल. हिंसाचार न पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपचे कार्यकर्ते द्वेष पसरवत आहेत, असा आरोपही गांधी यांनी केला.
किसान भाइयों आज ऐतिहासिक दिन है!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 13, 2024
कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला लिया है।
यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा।
न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है।#KisaanNYAYGuarantee
दिल्लीच्या वेशीवर शेतकरी मोठ्या संख्येने
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांचा एक गट सीमेच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातून आणि वाहने जाऊ शकत नाहीत अशा रस्त्यांवरून पायी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंजाबमधील शेतकरी १५०० ट्रॅक्टर आणि ५०० हून अधिक वाहनांसह दिल्लीला रावाना झाले आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रॅक्टरमध्ये जवळपास ६ महिन्यांचे रेशन शेतकऱ्यांनी सोबत ठेवले आहे.