गुजरात विधानसभा निवडणूक : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:31 AM2017-12-09T10:31:00+5:302017-12-09T10:33:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी सकाळी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून दोघांनीही मतदारांना हे आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करताना सांगितलं की, 'आज गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या या सणात सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करतो'.
Phase 1 of Gujarat polls begin. Urging all those voting today to turnout in record numbers and vote. I particularly call upon youngsters to exercise their franchise.
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2017
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'मतदारांचा सहभाग लोकशाहीचा आत्मा असतो. गुजरात निवडणुकीत प्रथमच मतदान करत असलेल्या माझ्या तरुण सहका-यांचं स्वागत आणि अभिनंदन. गुजरातच्या जनतेला आवाहन आहे की मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाहीला यशस्वी करा'.
मतदाताओं की भागीदारी लोकतंत्र की आत्मा होती है। गुजरात चुनाव में पहली बार वोट डाल रहे युवा साथियों का बहुत स्वागत और अभिनन्दन। गुजरात की जनता से अपील है कि भारी संख्या में मतदान कर लोकतंत्र के इस पर्व को सफल बनाएं।
— Office of RG (@OfficeOfRG) December 9, 2017
मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.
18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज
इतर सर्व्हेंप्रमाणेच टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने घेतलेल्या या सर्व्हेमध्येही भाजपाच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेमध्ये गुजरातमध्ये भाजपाला ४५ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. तर इतर पक्षांच्या झोळीत १५ टक्के मते जातील.
मिळणाऱ्या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला १११, काँग्रेसला ६८ तर इतरांना तीन जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हटले आहे. गुजरातमधील विविध भागात जीएसटी तसेच पाटिदारांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न यामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र भाजपाला गाठणे काँग्रेसला शक्य होणार नसल्याचे सर्व्हेत नमुद करण्यात आले आहे.