गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 01:16 PM2017-12-14T13:16:54+5:302017-12-14T13:33:21+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी साबरमतीमधील रानिप येथील 115 क्रमांकाच्या बूथवर मतदान केलं. मतदान करण्यासाठी पोहोचलेले नरेंद्र मोदी यावेळी रांगेत उभे होते.

Gujarat assembly election: Prime Minister Narendra Modi stood in the queue and voted for the right to vote | गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

गुजरात विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

Next

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी साबरमतीमधील रानिप येथील 115 क्रमांकाच्या बूथवर मतदान केलं. मतदान करण्यासाठी पोहोचलेले नरेंद्र मोदी यावेळी रांगेत उभे होते. नरेंद्र मोदी मतदान करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रांगेत उपस्थित लोकही त्यांची भेट घेत होते. मतदान केल्यानंतर मोदी बोटावरील शाई दाखवत मतदान केंद्रातून बाहेर येताना दिसले. यावेळी मोदींनी मोठा भाऊ सोम मोदी यांच्या पाया पडून आशिर्वादही घेतला. नरेंद्र मोदी दिसताना उपस्थित लोकांना मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. एकाप्रकारे रोड शोचं स्वरुप प्राप्त झालं होतं.



याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केलं. त्यांचं वय 97 वर्ष आहे. यावेळी त्यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच हे रामा गुजरातचं भलं कर असं म्हटलं आहे. हिराबेन यांच्यासोबत पंकज मोदी उपस्थित होते. पंकज मोदी त्यांना घेऊन मतदान केंद्रात पोहोचले होते. वयाच्या 97 व्या वर्षी मतदान करत हिराबेन इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करत आहेत. 



 

भाजपाचा पराभव होणार हे अटळ - हार्दिक पटेल
मतदान करण्यासाठी आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपाचा पराभव होणार हे अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी हार्दिक पटलेने गुजरातमधील जनतेला आवाहन करत आपली ताकद दाखवून द्यायला सांगितलं आहे. 'अहंकारात मिरवणा-यांच्या विरोधात मतदान करा. आपली ताकद काय आहे हे जनतेने दाखवून द्यावे', असं हार्दिक पटेल म्हणाला आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील  93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात असून दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने भाजपा आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रचार केला आहे. 

9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 66 टक्ते मतदान झाले होते. 2012 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात चार ते पाच टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे दुस-या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल. दुस-या टप्प्यात शहरी मतदारसंघ जास्त असून शहरी भागात भाजपाचे ब-यापैकी वर्चस्व आहे. अहमदाबादच्या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. उत्तर गुजरातमध्ये 53 जागा आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे 32 आणि काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. दुस-या टप्प्याच्या मतदानासाठी 25,558 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, युवा नेते अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी या लढतींकडे सगळयांचेच लक्ष लागले आहे.
 

Web Title: Gujarat assembly election: Prime Minister Narendra Modi stood in the queue and voted for the right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.