गुजरात निवडणूक: भाजपा नेते तेजिंदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत केला आनंद साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 01:22 PM2017-12-18T13:22:43+5:302017-12-18T15:36:01+5:30
भाजपा प्रवक्ता तेंजिदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत आनंद साजरा केला आहे. जातीचं आणि द्वेषाचं राजकारण करणा-यांनी हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत यावेळी मशरुमचा मुद्दा चांगलाच गाजला. मशरुमचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट झालं असून कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष सुरु केला आहे. भाजपा प्रवक्ता तेंजिदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत आनंद साजरा केला आहे. जातीचं आणि द्वेषाचं राजकारण करणा-यांनी हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्या सर्वांना जनतेने सणसणीत उत्तर दिल्याचंही ते बोलले आहेत.
ओबीसी एकता मंचाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं होतं. मोदी माझ्याप्रमाणे रंगाने काळे होते पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून दरदिवशी तैवान येथील मशरूम खायला सुरूवात केली आणि ते गोरे झाले असं विधान निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एका रॅलीमध्ये अल्पेश ठाकोर यांनी केलं होतं. मोदी दरदिवसाला 4 लाख रूपयांचे मशरूम खातात त्यामुळे त्यांना गरिबांचं जेवण आवडत नाही असं अल्पेश ठाकोर म्हणाले होते.
80-80 हजाराचे 5 मशरूम खातात मोदी - अल्पेश
''मोदी जे खातात ते तुम्ही खाऊ शकत नाही, कारण ते गरीबांचं जेवण करत नाहीत असं मला कोणीतरी म्हणालं. त्यामुळे ते नेमकं काय खातात असं मी विचारलं तर ते मशरूम खातात असं मला उत्तर मिळालं. पण साधं मशरूम ते खात नाहीत तर त्यांच्यासाठी खास तायवान येथून मशरूम येतं. त्या एका मशरूमची किंमत 80 हजार रूपये आहे, असे 5 मशरूम मोदी दररोज खातात. मुख्यमंत्री बनल्यापासून ते हे मशरूम खात आहेत'' असं उत्तर मला समोरून मिळालं.
35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय - अल्पेश
''मी मोदींचा 35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय , ते माझ्याप्रमाणेच रंगाने काळे होते. जो पंतप्रधान दिवसाला 4 लाखांचे मशरूम खातो, म्हणजे महिन्याला 1 कोटी 20 लाखांचे मशरूम खातो त्यांना गरिबांचं जेवण आवडणार नाही...ते केवळ दिखावा करतात''.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. देशाची अर्थवव्यवस्था बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी जी पावलं उचलली त्याला देशाने पाठिंबा दिला आहे. आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येण्यासाठी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्विकारलं आहे अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी मोदींचं कौतुक केलं. काँग्रेसचं नेतृत्व बदलणं भाजपासाठी शुभ संकेत असेल हे मी आधीच सांगितलं होतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दलित आंदोलनचा चेहरा जिग्नेश मेवानीचा 21 हजार मतांनी दणदणीत विजय
गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जिग्नेशने ट्विट करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेससाठी आशेचे किरण असणारे जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. जिग्नेश मेवानीला आपचाही पाठिंबा होता.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा विजय
राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रुपानी यांच्याकडे 21 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. मतदारसंघ सोडून आलेल्या काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचा दणदणीत पराभव झाला आहे. राजकोट पश्चिममध्ये इंद्रनील राजगुरू यांनी रुपानी यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्याचे मीडियाने रंगवलेले चित्र संपूर्णपणे चुकीचे ठरले आहे.
राजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. पेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या रिंगणात उतरले होते. 1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे.
इंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण होते. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पराभूत
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे कमळ फुलले असून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पण भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल मात्र सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्याने हिमालचमध्ये भाजपा समोर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. कारण पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हिमाचलमध्ये प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले होते.
केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या आलेल्या कलांनुसार भाजपा 110 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली.