गुजरात निवडणूक एकतर्फी होईल, भाजपाला आश्चर्याचा धक्का बसेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 05:57 PM2017-12-13T17:57:41+5:302017-12-13T18:05:40+5:30
मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं.
नवी दिल्ली: मला संपूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल, 92 जागांचा प्रश्न नाही. गुजरात निवडणूक पूर्णपणे एकतर्फी असेल कारण यंदा गुजरातमध्ये भाजपाबाबत बराच राग आहे. जे व्हिजन द्यायचं होतं ते व्हिजन भाजपा आणि मोदीजी देऊ शकले नाही. त्यामुळे मला वाटतं की, काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक जिंकेल असा विश्वास कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं. गुजरातसाठी जे व्हिजन द्यायचं होतं ते व्हिजन भाजपा आणि मोदी देऊ शकले नाही. त्यामुळे मला वाटतं की, गुजरातमध्ये कॉंग्रेस निवडणूक जिंकेल आणि काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
मोदींनी दिलेल्या काँग्रेसमुक्त भारत या ना-याबाबत बोलताना, काँग्रेस पक्ष जुनी विचारधारा आहे. ही भारतमुक्त होऊ शकत नाही असं बोलताना काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणखी रुजवण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रेमानं राजकारण करा, आजकाल राजकारणात ज्या पद्धतीनं बोललं जातं ते चुकीचं आहे. ते देशाला शोभत नाही. वैचारिक मतभेद हे असतातच पण तरीही थोडं तारतम्य बाळगून बोललं गेलं पाहिजे असं राहुल म्हणाले. जर देश काँग्रेसमुक्त झाला तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातील अर्धा वेळ काँग्रेसला का दिला असता? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
यावेळी बोलताना मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा राहुल यांनी पुन्हा निषेध केला. मणिशंकरजी जे बोलले ते माझ्यासाठी कधीही स्वीकारण्यायोग्य नाही, अशा शब्दात पंतप्रधानांबाबत आपल्या पक्षात बोललं जाणार नाही, मोदींना आमच्याबाबत काहीही बोलू दे. पण आमच्या पक्षातील लोकं त्याच्याबाबत आक्षेपार्ह बोलणार नाहीत. पंतप्रधान हे भारताचं प्रतिनिधीत्व करतात. त्या पदाचा मान हा राखलाच गेला पाहिजे, असं राहुल म्हणाले.
मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानी लोकांशी बैठक केली या मोदींनी केलेल्या आरोपावर टीका करताना एखाद्या माजी पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी बोलणं हे त्यांना शोभत नाही असं राहुल म्हणाले.