‘नरेंद्रभाई गळाभेट कामी आली नाही’, हाफिज सईदच्या सुटकेवरुन राहुल गांधींचा मोदींना टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 04:34 PM2017-11-25T16:34:56+5:302017-11-25T16:47:21+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी हाफिज सईदच्या नजरकैदेतून झालेल्या सुटकेवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘नरेंद्र भाई, गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेतली होती. यावरुनच राहुल यांनी मोदींना टोला लगावला आहे.
‘नरेंद्र भाई, गळाभेटीने काहीही साध्य झालं नाही. दहशतवादाचा मास्टरमाईंड मोकाटच आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान सैन्याला लष्कर फंडिंगबाबतही क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता मोदी आणि ट्रम्प यांच्या आणखी गळाभेटी घेण्याची आवश्यकता आहे,’ असं ट्विट करुन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.
Narendrabhai, बात नहीं बनी. Terror mastermind is free. President Trump just delinked Pak military funding from LeT. Hugplomacy fail. More hugs urgently needed.https://t.co/U8Bg2vlZqw
— Office of RG (@OfficeOfRG) November 25, 2017
मुंबईवरील 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची दोनच दिवसांपूर्वी नजरकैदेतून सुटका झाली. यानंतरच राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. याप्रकरणी अमेरिका कठोर भूमिका घेईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारला होती. पण, यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बाबतही पाकिस्तानी लष्कराला क्लीन चीट दिली. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरुनच राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी याआधीही मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीची खिल्ली उडवली होती. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्यावर ट्रम्प यांची गळाभेट घेतल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याची गरज व्यक्त केली होती. यावर राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य करत, ‘ट्रम्प यांची आणखी एक गळाभेट घेण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींवर टीका केली.
Modi ji quick; looks like President Trump needs another hug pic.twitter.com/B4001yw5rg
— Office of RG (@OfficeOfRG) October 15, 2017