हमासचा हल्ला म्हणजे 'टेरर अॅक्ट', थरूर यांचं वक्तव्य; मुस्लीम संस्थांनी पॅलेस्टाईनशी संबंधित कार्यक्रमातून हटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 10:04 AM2023-10-28T10:04:53+5:302023-10-28T10:07:44+5:30
काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य शशी थरूर यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे.
केरळमधील मुस्लिम समाजासाठी काम करणाऱ्या 'महल एम्पावरमेंट मिशन' (एमईएम) संस्थेने शुक्रवारी वरिष्ठ काँग्रेस नेते तथा तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांना 30 ऑक्टोबरला होणाऱ्या आपल्या पॅलेस्टाईन एकता कार्यक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्येकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) मधील प्रमुख पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) पॅलेस्टाईन एकता रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य शशी थरूर यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे.
"हमासचे हल्ले म्हणजे दहशतवादी कृत्य" -
इंडियन युनियन मुस्लिम लीगने आयोजित केलेल्या पॅलेस्टाईन एकता रॅलीतील थरूर यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादानंतर महापालिकेच्या 100 प्रभागातील जमात एमईएमने हा निर्णय घेतला आहे. थरूर यांनी 27 ऑक्टोबरच्या रॅलीमध्ये इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हणून संबोधले होते.
एमईएमचे अध्यक्ष शाहजहां श्रीकार्यम पीटीआयसोबत बोलताना म्हणाले, 'आम्ही थरूर यांना कार्यक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात त्यांनाही माहिती देण्यात आली आहे.' थरूर यांच्या संबंधित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाही येत आहेत. यासंदर्भात, थरूर यांनी स्पष्टीकरण जारी करत, आपण नेहमीच पॅलेस्टाईनच्या लोकांबरोबर आहोत आणि आययूएमएल रॅलीमधील आपल्या भाषणातील एका वाक्याच्या प्रचार-प्रसाराशी सहमत नाही. कोझिकोडमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.