भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:08 PM2024-10-08T16:08:55+5:302024-10-08T16:09:37+5:30

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

Haryana Election 2024 : BJP's strategy worked; 'All is well' in Haryana, farmers and youth are not upset | भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

Haryana Election 2024 : आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर, हरयाणात भाजपचा सलग तिसऱ्यांदा विजय झाला आहे. या हॅट्रीकसह नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. हरयाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यामुळे, आजचा हा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल, पण असे नाही. भाजपचे राजकारण आणि रणनीती बारकाईने जाणून घेतल्यास हरयाणाचा निकाल तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही.

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने हरयाणा विधानसभा निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा मुद्दा बराच उचलून धरला होता. विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने भाजपवर चौफेर टीका केली होती. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आपल्या माडण्यांसाठी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणाच्या सीमा खुल्या केल्या जातील, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. विशेषत: जाट समाजाला भाजपपासून दूर करण्यासाठी बरीच रणनीती आखण्यात आली.

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...

एकंदरीत, हरयाणातील शेतकरी भाजपवर नाराज आहेत, ते भाजपला आता धडा शिकवतील, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने निकाल येत आहेत, त्यावरुन असे दिसते की, शेतकरी भाजपवर नाराज नसून, खुश आहेत. आता प्रश्न पडतो की, मतदानापूर्वी भाजपच्या विरोधात फिरणारे वारे अचानक भाजपच्या दिशेने कसेकाय फिरू लागले? भाजपने नेमकी कोणती रणनीती अवलंबली, ज्यामुळे पक्षाचा एकहाती विजय झाला.

शेतकरी खरच नाराज होते का?
हरयाणा निवडणुकीतील दुसरा सर्वात मोठा मुद्दा 'जवानांचा' होता. काँग्रेसने अग्निवीर योजनेचा संबंथ हरयाणाशी जोडला. याचे कारण म्हणजे, लष्करातील सुमारे 10 टक्के सैनिक हरयाणातील आहेत. हरयाणाची लोकसंख्या 3 कोटींच्या आसपास आहे. एवढेच नाही तर शेतकरी आणि सैनिकांचा प्रश्न हरयाणातील प्रत्येक घराशी संबंधित आहे. केंद्र सरकारची 'अग्नवीर योजना' ही सैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने देशभरात हेच मुद्दे मांडले होते. हरयाणात भाजप-काँग्रेसने लोकसभेच्या 5-5 जागा जिंकल्या होत्या.  तर, हरियाणाच्या 'जाट'बहुल भागात भाजपला ज्या प्रकारे यश मिळतंय, ते पाहता शेतकरी आणि सैनिकांचा मुद्दाच कुठे आहे? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या निकालावरुन हेही स्पष्ट होईल की, 'अग्नीवीर योजने'बाबत विरोधक जो नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा स्थानिक पातळीवर काहीही परिणाम झालेला नाही. 

भाजपची रणनीती कामी आली
दुसरीकडे, भाजपच्या विजयाचे श्रेय त्यांच्या रणनीतीलाही जाते. हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करुन किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीरबाबत भाजपने हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराजी कशाला, असा संदेश जनतेत गेला. यामुळेच भाजपला जनतेचा पाठिंबा मिळाला. आता भाजप त्याचे भांडवल देशातील इतर राज्यांमध्येही करेल, असे म्हणता येईल. यासोबतच अग्निवीर योजनेची मान्यताही वाढली असून, ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या मागण्यांचाही विचार करावा लागणार आहे.

हरियाणात हॅटट्रिक...भाजपसाठी बूस्टर डोस
लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा निवडणूक ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणीत भाजपला जोरदार यश मिळाले असून, आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथे हरियाणा निवडणुकीचा स्पष्ट संदेश जाईल की, शेतकरी आणि सैनिक भाजपसोबत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे, भाजपसाठी मोठा दिलासा आहे.

 

Web Title: Haryana Election 2024 : BJP's strategy worked; 'All is well' in Haryana, farmers and youth are not upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.