"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 08:19 AM2024-10-11T08:19:37+5:302024-10-11T08:19:54+5:30

रयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीत झालेल्या बैठकीत अचानक आपली रणनीती बदलली आहे.

Haryana Election Congress will not blame EVM for its defeat big decision in review meeting | "EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

Haryana Assembly Election : हरयाणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. हरयाणाच्या निवडणुकीच्या निकालात मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम हॅक झाल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. त्यामुळे २० जागांच्या निकालात फेरफार झाल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मात्र आता हरयाणामधील पराभवानंतर काँग्रेसने अचानक आपली रणनीती बदलली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन कोणतीही टीका करणार नसल्याचे काँग्रेसने ठरवलं आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते ईव्हीएमवरुन निवडणूक आयोगावर आरोप करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमला लक्ष्य करण्याऐवजी पक्षाला आता अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हरयाणात विजयाच्या जवळ जावून देखील तो मिळवता न आल्याने काँग्रेस आता पक्षातील उणिवा शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी ईव्हीएमवर आरोप केले होते आणि निवडणुकीचे निकाल चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसच्या रणनीतीकारांनी ठरवले आहे की ते पुरेशा पुराव्याशिवाय ईव्हीएमवर हल्ला करणार नाहीत.

हरयाणातील पराभवावर काँग्रेस पक्षाने गुरुवारी आढावा बैठक बोलावली होती. पक्षांतर्गत गटबाजी आणि इतर चुका दूर करण्यावर आता पक्ष भर देणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आलं. तसेच ईव्हीएम छेडछाडीचे ठोस पुरावे मिळेपर्यंत आपण हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत आणि पक्षातील अंतर्गत उणिवा ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या हायकमांडने म्हटल. गुरुवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयातून यासंदर्भात एक पत्र जारी करण्यात आले आहे. पक्षाने एक तांत्रिक टीम तयार केली आहे जी ईव्हीएम आणि मतदानाबाबत उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची तपासणी करेल आणि खऱ्या उणिवा शोधून काढेल, असे या पत्रात म्हटलं आहे.

फॅक्ट फाइंडिंग टीमच्या अहवालानुसारच काँग्रेस  ईव्हीएम बाबत कोणतीही प्रतिक्रिया देईल, असे या पत्रात म्हटले आहे. मतमोजणी प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कार्यपद्धतीवर तथ्य-शोधन पथकाच्या अहवालाच्या आधारे काँग्रेस सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे खरगे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बीएस हुड्डा आणि त्यांच्या विश्वासू लोकांव्यतिरिक्त, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा आणि त्यांचे सहकारी रणदीप सिंग सुरजेवाला यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले नव्हते. निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी सेलजा यांच्यात तणाव निर्माण झाला होता. कुमारी सेलजा यांनी बराच काळ निवडणूक प्रचारात भाग घेतला नाही. हरयाणातील पराभवानंतर या दोन्ही गटांचे लोक एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. मात्र या बैठकीत पक्षाचे हित सर्वोपरि असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी पक्षश्रेष्ठींना आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी काम करण्यास सांगितले आहे.

Web Title: Haryana Election Congress will not blame EVM for its defeat big decision in review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.