हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:01 IST2024-10-08T15:00:36+5:302024-10-08T15:01:02+5:30
Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने हॅट्रीक मारली आहे.

हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
Haryana Election Result 2024: आज हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, हरयाणात भारतीय जनता पक्ष (BJP) 50 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसच्या खात्यात 35 जागा येत आहेत. या आकडेवारीनुसार, हरयाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपसाठी पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे.
दोन्ही राज्यांत 'मोदी मॅजिक'
जम्मू-काश्मीर आणि हरयाणात पुन्हा एकदा मोदी मॅजिक पाहायला मिळत आहे. J&K मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे, पण भाजपला फारसा फरक पडलेला नाही. भाजपचे फक्त एक-दोन जागांवर नुकसान होत आहे. तर, NC-काँग्रेस मिळवलेल्या सर्वाधिक जागा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाच्या आहेत. तिकडे, हरियाणामध्ये भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. मागील निवडणुकीत 30 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा 50 जागा मिळताना दिसत आहेत. यावरुनच या दोन्ही राज्यात मोदी मॅजिक कायम असल्याचे दिसून येते.
राहुल गांधींची जादू फिकी पडली
एकीकडे पंतप्रधान मोदी भाजपसाठी पुन्हा एकदा लकी ठरले, तर दुसरीकडे राहुल गांधी काँग्रेससाठी काही विशेष चमत्कार करू शकलेले नाहीत. हरयाणात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी एकूण 5 सभा घेतल्या. या रॅलींचा परिणाम हरियाणातील 17 विधानसभा जागांवर झाला. यापैकी भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, राहुल गांधींनी हरियाणात ज्या 14 जागांवर रॅली काढली, त्यापैकी फक्त 4 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, भाजप 7 आणि अपक्ष तीन जागांवर पुढे आहेत.