"हुकूमशाहीपुढे झुकलेलो नाही आणि झुकणारही नाही", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:19 PM2024-02-16T14:19:27+5:302024-02-16T14:20:43+5:30
Congress Frozen Account Row : आयटी न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Congress Frozen Account Row : (Marathi News) नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती आयकर विभागाकडून गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आयटी न्यायाधिकरणाकडून काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. काँग्रेसची बँक खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. तसेच, या प्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी आयटी न्यायाधिकरणात होणार आहे. दरम्यान, आयटी न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "घाबरू नका नरेंद्र मोदीजी, काँग्रेस हे पैशाच्या सत्तेचे नाव नाही तर लोकांच्या सत्तेचे नाव आहे. हुकूमशाहीपुढे झुकलेलो नाही आणि झुकणारही नाही. भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता मनापासून लढेल. "
डरो मत मोदी जी, कांग्रेस धन की ताकत का नहीं, जन की ताकत का नाम है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 16, 2024
हम तानाशाही के सामने न कभी झुके हैं, न झुकेंगे।
भारत के लोकतंत्र की रक्षा के लिए हर कांग्रेस कार्यकर्ता जी जान से लड़ेगा।#DemocracyUnderAttack
दरम्यान, याआधी काँग्रेसने आरोप केला होता की, पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस नेते अजय माकन यांनी हा आरोप केला होता. अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी २०१८-१९ च्या आयकर रिटर्नच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती आणि २१० कोटींच्या वसुलीची मागणी करण्यात आली होती. ही फक्त काँग्रेसचीच खाती फ्रीज केली नाहीत, तर आपल्या देशाची लोकशाही फ्रीज केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
पुढची सुनावणी बुधवारी होणार
अजय माकन म्हणाले, 'आम्ही आयकर अपीलीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे आणि आमच्या वतीने ज्येष्ठ वकील विवेक तंखा उपस्थितीत आहेत.'बुधवारपर्यंत काँग्रेसच्या खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. आम्ही आमची बाजू आयकर अपील न्यायाधिकरणासमोर मांडली. आता काँग्रेसची सर्व खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत, पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
नऊ खाती गोठवण्यात आला होती
याआधी अजय माकन म्हणाले होते की, पक्षाच्या युवा शाखा इंडियन युथ काँग्रेसच्या खातीही गोठवण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण नऊ खाती गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अजय माकन म्हणाले, 'भारतात लोकशाही धोक्यात आहे, १४ फेब्रुवारी रोजी आम्हाला माहिती मिळाली की आम्ही जारी करत असलेले धनादेश बँका स्वीकारत नाहीत. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. आता बुधवारपर्यंत ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.