Hathras Gangrape: ‘हात’वाल्यांना केवळ राजकारणात ‘रस’; आठवलेंचं काँग्रेसवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 02:32 AM2020-10-04T02:32:39+5:302020-10-04T07:04:20+5:30
Hathras Gangrape Ramdas Athawale slams congress: वेळप्रसंगी योगींनाही जाब विचारेन; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ‘लोकमत’शी बातचीत
- विकास झाडे
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात मायावती आणि मुलायम व अखिलेश यादव यांचे सरकार असतानाही दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत. केवळ योगी सरकारलाच जबाबदार धरता येणार नाही. जातीयतेतून या घटना घडतात; परंतु वेळप्रसंगी मी योगींनाही जाब विचारणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अशा घटना संबंध देशात होतात. त्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याकडे लक्ष वेधताना आठवले म्हणाले, हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा संकल्प योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेच्या अंत्यसंस्काराला आई-वडिलांनाही हजर राहू दिले नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
राहुल गांधींचे केवळ राजकारण
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरसला जाण्याचा जो प्रकार केला तो केवळ राजकारणाचा भाग आहे. ‘हात’वाल्यांना केवळ राजकारणात ‘रस’ आहे. त्यांनी किती दलितांना न्याय दिला? राजस्थानमध्ये घटना घडली तेव्हा या नेत्यांच्या तोंडातून शब्दही निघाला नाही, असेही ते म्हणाले.