Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:11 PM2020-10-01T15:11:34+5:302020-10-01T15:18:48+5:30

Hathras Gangrape : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती मिळत आहे. 

hathras rape case rahul priyanka gandhi will go to hathras district police stop at border | Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना

Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तरुणीची जीभ देखील कापली. गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी सकाळी पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती मिळत आहे. 

यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं आहे. यामुळे पायी प्रवास करत हाथरसकडे रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. 

"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा आम्ही उन्नावच्या लेकीसाठी अशी लढाई लढत होतो" असं प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली होती. गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू झाला. 

"बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा"

बलरामपूरमध्ये ही एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "उत्तर प्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू आहे. जिवंत असताना कधी त्यांना सन्मान दिला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा आहे" असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच Balrampur Horror असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

"तो आदेश कोणी दिला?, कधीपर्यंत हेच चालत राहणार?, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?"

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर पुन्हा एकदा प्रियंका यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. "मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीने हिसकावून घेत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कोणी दिला?, मागील 14 दिवसांपासून तुम्ही कुठे झोपला होतात? कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल

"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी याआधी जोरदार टीका केली होती. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: hathras rape case rahul priyanka gandhi will go to hathras district police stop at border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.