राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकला - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:29 PM2021-11-23T13:29:37+5:302021-11-23T13:30:56+5:30
भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला सोमवारी केली.
भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. दंडाधिकाऱ्यांच्या या समन्सला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत त्यांच्यावरील संपूर्ण कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे सोमवारी होती.
सोमवारच्या सुनावणीत श्रीश्रीमल यांचे वकील रोहन महाडिक यांनी या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागितली. त्यावर राहुल गांधी यांचे वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, श्रीश्रीमल यांना उत्तर देण्यास मुदत देण्यास आमची काही हरकत नाही, मात्र तोपर्यंत दंडाधिकारी पुढील सुनावणी घेऊ शकत नाही.
न्यायालयाने श्रीश्रीमल यांना राहुल गांधी यांच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत देत दंडाधिकारी यांना दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी न ठेवता २० डिसेंबरनंतर पुढील सुनावणी घेण्याची सूचना केली.
राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे सदस्य महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. या दाव्याची दखल घेत दंडाधिकाऱ्यांनी २८ ऑगस्ट २०१९ मध्ये फौजदारी कारवाई करत राहुल गांधी यांना समन्स बजावले होते.