राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला हॉलिवूडमधून पाठिंबा! 'या' अभिनेत्याने ट्विटद्वारे केले कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:18 PM2022-09-26T23:18:47+5:302022-09-26T23:20:05+5:30
Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचे जॉन क्यूसैकने कौतुक केले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या पंधरवड्यापासून अनेक ठिकाणी फिरली आहे. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरही भारत जोडो यात्रेची चर्चा जोरात सुरू आहे. या भारत जोडो यात्रेला अनेकांनी पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. यात सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉन क्यूसैकचाही समावेश आहे. जॉन क्यूसैकने काँग्रेसच्या या यात्रेचे कौतुक केले आहे.
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींच्या प्रयत्नांचे कौतुक करताना जॉन क्यूसैकने ट्विटरवर लिहिले की, "भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत." त्यावर एका यूजरने त्याला धन्यवाद असा रिप्लाय दिला आहे. त्याच यूजरला अभिनेत्याने पुन्हा रिप्लाय दिला आहे की, "होय – एकता – सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध." दरम्यान, या ट्विटमुळे जॉन क्यूसैकला टीकेचाही सामना करावा लागला आहे. जॉन क्यूसैकची ही पडझड असल्याचे अनेकजण सांगत आहेत.
Indian parliament member Rahul Gandhi is walking to Kashmir - from Kerala -
— John Cusack (@johncusack) September 23, 2022
जॉन क्यूसैकने 2012 आणि 'से एनीथिंग' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकप्रियता मिळवली आहे. याआधीही हॉलिवूड अभिनेत्याने भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोध आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचे त्यांनी कौतुक केले आहे.
काय आहे 'भारत जोडो यात्रा'?
देशात लोकसभा निवडणूक 2024 साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे'चे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झाला. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी तेथील नागरिकांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसची भारत जोडी यात्रा 150 दिवसांत 3,570 किमी अंतर पार करणार आहेत. या यात्रेची सांगता जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे.