हनीट्रॅप: काँग्रेसकडे भाजपा आणि संघाच्या अनेक नेत्यांचे व्हिडीओ आणि सीडी, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:20 PM2023-01-03T20:20:19+5:302023-01-03T20:21:28+5:30
Honeytrap: काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंह यांनी भाजपाचे नेते, मंत्री, आमदार आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे तमाम अश्लील व्हिडीओ आणि सीडी काँग्रेसकडे आहेत, असा दावा केला आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्याअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा हनिट्रॅपचं भूत पुन्हा एकदा बाहेर आले आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंह यांनी भाजपाचे नेते, मंत्री, आमदार आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे तमाम अश्लील व्हिडीओ आणि सीडी काँग्रेसकडे आहेत, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. विनाकारण आरोप लावणे ही काँग्रेसची संस्कृती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आमदार सुनील सराफ यांचा बंदूक उंचावतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने कारवाईचे आदेश दिले होते. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना गोविंद सिंह यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांचे ज्या प्रकारचे चारित्र्य आहे, तसे काँग्रेस नेत्यांे नाही. भाजपाचे अनेक नेते, मंत्री आणि आमदारांची सीडी आमच्याकडे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही अनेक लोक आहेत. ज्यांच्या सीडी आमच्याकडे आहेत. मात्र कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारचे आरोप लावणे आमच्या संस्कृतीमध्ये नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सुनील सराफ यांचंही समर्थन केले. सुनील सराफ यांनी आनंदोत्सव साजरा करताना फायर केली होती. ही काही आक्षेपार्ह बाब नाही. भाजपाने हनिट्रॅपमध्ये सामील लोकांची चौकशी करून त्यांना शिक्षा दिली पाहिजे.
गोविंद सिंह पुढे म्हणाले की, हनिट्रॅपची सीडी आमच्याकडील रेकॉर्डमध्येही ठेवलेली आहे. सीडी तर आधीच सार्वजनिक झालेली आहे. ती सार्वजनिक करण्यासारखं काम काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये नाही. कुणाचीही नावं काँग्रेसकडून जाहीर केली जणार नाहीत कारण कुणावरही वैयक्तिक आरोप करणे योग्य ठरणार नाही. ही सीडी खूप अश्लील आहे. त्यामुळे ती जनतेसमोर येता कामा नये. मात्र दुहेरी चारित्र्य असलेल्या लोकांचे चेहरे सार्वजनिक झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, डॉ. गोविंद सिंह यांच्या सीडीबाबतच्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. काँग्रेसने आता ब्लॅकमेलिंगचं राजकारण बंद केलं पाहिले. हनिट्रॅपचा पोलीस तपास करत आहेत. अशा परिस्थिती ते त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा करत आहेत. काँग्रेस नेत्यांजवळ पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे दिले पाहिजेत. असं न करून काँग्रेस पुरावे लपवत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.